*सत्तेचा गैरवापर करूनही बीडमधून विजय माझाच* *विठ्ठलाच्या पंढरी नगरीत महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे याची खात्री*

पंढरपूर/प्रतिनीधी
आजवर बीड लोकसभा मतदार संघातील जनता ही भाजपकडे पाहून मतदान न करता केवळ स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या प्रेमापोटी करत होते. यावेळी मात्र शेतकरी विरोधी धोरणे असलेल्या भाजप सरकारच्या विरोधात मोठी लाट पहावयास मिळाली आहे. या सरकारच्या विरोधात लाट असतानाही केवळ सत्तेच्या जोरावर वाटेल ते करण्याचा प्रयत्न भाजप उमेदवाराकडून झाला आहे. मात्र याकडे फारसे महत्व न देता बीड मतदार संघातील जनतेने मला यावेळी विजयी करण्याचाच पक्का निर्णय घेतल्याने आपला विजय पक्का असल्याची खात्री महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी विठ्ठलाच्या पंढरीत दिली आहे.
बजरंग सोनवणे हे आज देवदर्शन करण्यासाठी जेजुरीहून पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी आले होते. यावेळी उद्योजक हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी गप्पा मारल्या. यावेळी सोनवणे यांचा जंगी सत्कार करण्यात आला. यावेळी पंढरपूर येथील अनेक नेते उपस्थित होते.
यावेळी बोलताना सोनवणे म्हणाले की, राज्यातून शरद पवार यांचा पक्ष फुटला असल्याने कशी परिस्थिती होईल असे विरोधकांना वाटत होते. मात्र सत्तेच्या बाजूला नेते गेले असेल तरी शरद पवार यांचे विचार जाग्यावरच होते.यामुळे त्याच विचारातून मागील वेळी झालेल्या पराभवाचे रूपांतर माझ्या विजयात होणार असल्याचे आवर्जून सांगितले.
मी पूर्वीपासून अजित पवार यांच्यावर प्रेम करणारा कार्यकर्ता होतो. पूर्वी अजितदादा हे विरोधक यांचीही कामे करत होते. दादांच्या कामाची पुरती पद्धत बदलत गेल्याचेही त्यांनी सांगितले. आपण शरीराने दादासोबत असलो तरी आपले मन मात्र पूर्णतः शरद पवार यांच्या बाजूने होते. त्यामुळे आपण उमेदवारी घेण्यापूर्वी स्वतः अजित पवार यांचेसोबत तब्बल सहा तास चर्चा करून परवानगी घेतली असल्याचेही सोनवणे यांनी स्पष्ट केले आहे.
बीड येथील मतदार संघात स्थानिक अधिकारी यांना निवडणुकीत बदली होणे हा नियम असताना काही अधिकारी त्याच ठिकाणी कार्यरत होते. एवढी मोठी गंभीर चूक असतानाही याकडे निवडणूक अधिकारी यांना तक्रार करूनही कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याची खंत बोलून दाखविली. आपल्या शासकीय अधिकाराचा वापर याच अधिकारी यांनी आपली खाजगी संपत्ती असल्यासारखे दाखवीत भोगस मतदान करण्याकामी सहकार्य केल्याचा आरोपही यावेळी बजरंग सोनवणे यांनी केला आहे.
मागील ३०वर्षात मराठा समाजाने केवळ मुंडेसाहेब यांना मतदान केले होते. यावेळी मात्र शेतकरी मराठा समाज पूर्णतः भाजप विरोधात गेल्याने मला साथ देण्यासाठी पुढे आल्याचे दिसून आले आहे. विरोधक यांचेकडून मात्र मतदान संपताच याच मराठा समाजावर जातीवादाचा आरोप केला आहे. त्यामुळे ही निवडणूक जातीवर न होता, केवळ भाजपचे मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात झाल्याचे ठणकावून सोनवणे यांनी सांगितले आहे. याबाबत ओबीसी विरुद्ध मराठा अशी चर्चा सुरू असून ती चर्चा साफ चुकीची असून ही तर केवळ भाजप विरोधातील कट होती असेही स्पष्टीकरण यावेळी बजरंग सोनवणे यांनी दिले आहे.
यावेळी उद्योजक हिम्मत आसबे, सागर यादव,संदीप मांडवे, किरण घाडगे, संदीप पाटील, प्रशांत शिंदे, दिलीप कोरके, जितेंद्र डोंबे, अमोल आटकळे, सचिन रोंगे, मुस्ता इनामदार, सचिन डोईफोडे, विक्रांत आसबे, अमोल आटकळे यांचेसह विविध राजकीय पक्ष आणि मराठा संघटना पदाधिकारी उपस्थित होते.
चौकट
*बीडचा विकास करण्याची ताकद मिळो*
श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शन घेताना आपण बीड जिल्ह्याचा विकास करण्याची ताकद मिळावी. अशी प्रार्थना केल्याचे सांगितले. तसेच याच भागात जातीचे विष पेरण्याचे जे काम चालू आहे. त्याला मूठमाती मिळावी.एवढं मागणं घातल्याचे सांगितले.