*पंढरपूर येथे मराठा भवन बांधण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून 5 कोटीच्या निधीस प्रशासकीय मान्यता* *पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने मराठा समाजासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज सांस्कृतिक भवन कामाची निविदा प्रसिद्ध
पंढरपूर /प्रतिनिधी
कार्तिकी वारी 2023 मध्ये श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री महोदय यांना करण्यास सकल मराठा समाजाने विरोध केला होता व त्यासाठी पंढरपूर येथे मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सकल मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली व पंढरपूर येथे मराठा भवन बांधण्याची आंदोलनकर्त्यांची मागणी त्यांनी मान्य केली होती. त्या मागणीच्या अनुषंगाने जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून पंढरपूर येथे मराठा भवन बांधण्यासाठी पाच कोटीच्या निधीस जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी अत्यंत तत्परतेने प्रशासकीय मान्यता प्रदान केल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेली आहे.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पंढरपूर येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज सांस्कृतिक भवन बांधण्यासाठी दिलेल्या 5 कोटी 5 लाख 21 हजार 704 रुपयांच्या निधीतून पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने कामाची निविदाही प्रसिद्ध केलेली आहे. परंतु पंढरपूर शहरात मराठा समाजासाठी सांस्कृतिक भवन बांधण्यासाठी जी जागा उपलब्ध झालेली आहे त्या जागेवर पार्किंगचे आरक्षण असल्याने ते आरक्षण काढण्याबाबत जिल्हा प्रशासनाने नगर विकास विभागाला कळविलेले आहे. तसेच हे आरक्षण काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने पाठपुरावा सुरू असून पुढील आठ ते दहा दिवसात हे आरक्षण काढले जाणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेली आहे.
लकरच पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने पंढरपूर शहरातील सर्वे नंबर 142 अंतर्गत संत गजानन महाराज पिछाडी रस्ता स्टेशन रोड पंढरपूर ही जागा मराठा सांस्कृतिक भवन साठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. मराठा समाजासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज सांस्कृतिक भवन बांधण्याच्या कामाची निविदा प्रक्रिया प्रसिद्ध झालेली असून ही प्रक्रिया विहित कालावधीत पूर्ण करून संबंधित एजन्सीला कार्यारंभ आदेश देण्यात येणार आहेत. पंढरपूर शहरात सांस्कृतिक भवन बांधण्यासाठी आवश्यक असलेली चांगली जागा शोधण्यात खूप वेळ गेला. सकल मराठा समाजाची पंढरपूर शहरात सांस्कृतिक भवन बांधण्याची मागणी मान्य झाल्यानंतर हा समाज अत्यंत सकारात्मक राहून प्रशासनाला सहकार्य केलेले आहे.
********