*मतदारांनी विकासप्रिय आ. समाधान अवताडे यांना साथ द्यावी - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी*
पंढरपूर /प्रतिनिधी
भारतात फार मोठी संपत्ती आहे. संपत्तीची येथे कोणतीही कमी नाही, उद्यमशील आणि
विकासप्रिय नेतृत्वाची कमी आहे. समाधान अवताडे यांच्या रूपाने
तुम्हाला विकासप्रिय आमदार मिळाला आहे,
आजवर त्यांनी मतदारसंघात मोठा विकास घडवून आणला आहे. येथील मतदारांनी त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहावे, त्यांच्या कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना मोठे मताधिक्य देऊन, विधानसभेत पाठवावे, असे आवाहन केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची गुरुवार दि.
१४ नोव्हेंबर रोजी मंगळवेढा येथे जाहीर सभा पार पडली. भाजपाचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारासाठी ही सभा आयोजित करण्यात आली होती. या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उमेदवार समाधान आवताडे, माजी आ. प्रशांत परिचारक यांच्यासह महायुतीतील इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, भारत हा
गाव आणि खेद्यांनी बनलेला देश आहे. मागील ७५ वर्षात
येथील खेडी रस्त्यावाचून अडगळीत पडली होती. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना ती गोष्ट खटकत होती. यावेळी त्यांनी सांगितले की, प्रत्येक छोटे छोटे गाव
रस्त्यांनी जोडण्याचा आराखडा बनवा. यावर तीन महिने परिश्रम घेऊन
आराखडा बनवण्यात आला. आणि पंतप्रधान ग्रामसडक योजना अस्तित्वात आली. या योजनेतून हजारो गावे रस्त्यांनी जोडण्यात आली.
मागील दहा वर्षाच्या काळात, राज्यात मोठ्या रस्त्यांचे जाळे झाले आहे.
पंढरपूर आणि मंगळवेढा शहरापर्यंत रस्ते पोहोचले आहेत. विकासासाठी देशात पैशाची कमी नाही.
उद्यमशील नेतृत्वाची गरज आहे. आ. समाधान अवताडे यांनी अडीच वर्षाच्या कालावधीत या तालुक्यात मोठे काम केले आहे. म्हैसाळ योजनेस काही दिवसात मूर्त स्वरूप येणार आहे. या भागाचा या योजनेमुळे कायापालट होणार आहे.
एमआयडीसी आणि हजारो कोटी रुपयांची विकासकामे या ठिकाणी सुरू आहेत. आ. समाधान अवताडे यांच्या रूपाने, आपणास विकासप्रिय आमदार मिळाला आहे. येथील मतदारांनी ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे राहावे, आणि येत्या २० तारखेला कमळ या चिन्हा समोरील बटन दाबून त्यांना भरघोस मतांनी विजयी करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
*आ. परिचारक यांचे गडकरींकडून कौतुक*
सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक हेही विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. परंतु भाजपकडून अवताडे यांना उमेदवारी देण्यात आली. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून परिचारक यांची समजूत घालण्यात आली. यामुळे परिचारक यांनी माघार घेत, आ. समाधान आवताडे यांचा प्रचार सुरू केला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी
त्यांच्या नावाचा उल्लेख करत, त्यांचे आभार मानले.
*सोलापूर जिल्ह्यातील १६ हजार कोटींची कामे पूर्णत्वाकडे*
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बोलताना सांगितले की, मागील काही महिन्यांपूर्वी, मी सोलापूर येथील कार्यक्रमात विकासकामांची घोषणा केली होती. ही कामे १६
हजार कोटी रुपयांची होती. यावेळी उपस्थित नागरिकांनी तोंडात बोटे घातली होती. आता मला सांगण्यास आनंद होतो की, यापैकी अनेक कामे पूर्ण झाली असून, काही कामे पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. सोळा हजार कोटी रुपयांपैकी, १५ हजार कोटी रुपयांची कामे पूर्णही झाली आहेत.