लहान मुलांसाठी कोविड हॉस्पिटलमध्ये 20 टक्के बेड राखीव ठेवावीत प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या सूचना  

 

                    पंढरपूर दि. 30 :  कोरोना संसर्गाचा संभाव्य  तिसऱ्या लाटेत लहान मुलं बाधित होण्याची  शक्यता असल्याने तालुक्यातील शहरासह ग्रामीण भागातील  डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल व कोविड केअर सेंटर येथे  20 टक्के बेड लहान मुलांच्या उपचारासाठी राखीव ठेवावित अशा सूचना प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी  दिल्या.

            प्रांताधिकारी कार्यालयात संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने बैठक घेण्यात आली या बैठकीस तहसिलदार सुशिल बेल्हेकर, उपजिल्हा रुग्णालयांचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.अरविंद गिराम , बालरोग तज्ञ तसेच डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल डॉक्टर्स उपस्थित होते.

            यावेळी प्रांताधिकारी ढोले म्हणाले, कोरोनाच्या संभाव्य तीसऱ्या लाटेत लहान बालके बाधित झाल्यास त्यांना आवश्यक ते उपचार वेळेत मिळावेत तसेच त्यांच्या सोबत पालकांनाही ठेवावे लागणार असल्याने  यासाठी कोविड हॉस्पिटल व कोविड केअर सेंटर आवश्यक ते नियोजन करावे. लहान मुलांमध्ये कोरोनाची लक्षणे वेगळी असणार आहेत. तिसरी लाट ही लहान मुलांसाठी अधिक बाधक ठरणार असल्याची शक्यता वर्तवली जात असल्याने अतिदक्षता   बेड, व्हेटींलेटर, पुरेसा औषधसाठी, सुसज्ज रुग्णवाहिका, उपचासाठी कुशल मनुष्यबळासह अद्यावत यंत्रणा तयार करावी यासाठी प्रशासनाकडून आवश्यक सहकार्य करण्यात येईल असेही  प्रांताधिकारी ढोले यांनी यावेळी सांगितले.

            तालुक्यात शहरासह ग्रामीण भागातील एकूण  21  कोरोना बाधितांच्या उपचारासाठी कोविड हॉस्पिटलला  मान्यता देण्यात आली आहे. त्यामध्ये दोन  लहान मुलांचे हॉस्पिटल असून, इतरही बालरुग्णालयांनी   कोविड हॉस्पिटल मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करावेत त्यांना तात्काळ मंजूरीबाबतची कार्यवाही करण्यात येईल असे, वैद्यकीय अधिक्षक डॉ.गिराम यांनी सांगितले.

000000