*मंगेश चिवटेंच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादीही मैदानात* ;*शिवसेना-राष्ट्रवादीच्या ताकदीवर विजयाचा आमदार रामराजे निंबाळकरचा विश्वास*
फलटण /प्रतिनिधी
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फलटण येथे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार मंगेश चिवटे यांच्या प्रचारार्थ आयोजित ‘विजय संकल्प सभा’ उत्साहात पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा विधान परिषदेचे आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सभेत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीबाबत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाकडून महत्त्वपूर्ण राजकीय भूमिका मांडण्यात आली.
*यावेळी बोलताना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी मंगेश चिवटे यांना स्पष्ट शब्दांत लढत कायम ठेवण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, “आपण लढतीला तर उतरलेलो आहोत. महायुतीमध्ये राज्यपातळीवर आपलं ऐकलं गेलं नाही, दिलेला शब्द पाळला नाही, तर अपक्ष लढा. फलटणचा DNA मध्येच अपक्ष आहे. तुम्ही काळजी करू नका.”*
आपल्या राजकीय प्रवासाचा संदर्भ देताना रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले, “मी १९९६ साली आलो तेव्हाही असंच सर्वांनी मला पाठवलं होतं.” त्यांच्या या वक्तव्यामुळे मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत फलटणच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले.
दरम्यान, सभेत बोलताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीला ठाम पाठिंबा व्यक्त करताना स्पष्ट केले, “एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार आणि मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत मंगेश चिवटे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. आता कोणत्याही परिस्थितीत माघार नाही, तर निवडूनच यायचे.”
मंगेश चिवटे यांच्या जनसेवेचा उल्लेख करताना संजीवराजे नाईक निंबाळकर म्हणाले, “मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून त्यांनी केलेली अविरत रुग्णसेवा हीच त्यांची खरी ताकद आहे. सामान्यांच्या अडचणीच्या काळात त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे काम त्यांनी केले आहे. हीच जनसेवेची पार्श्वभूमी शिक्षक मतदारसंघातील त्यांच्या उमेदवारीची प्रमुख ओळख आहे.”
या विजय संकल्प सभेचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती. त्यामुळे फलटणमध्ये मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाकडूनही राजकीय पाठबळ मिळत असल्याचा संदेश या सभेतून देण्यात आला.
दरम्यान, पुणे येथे मंत्री, खासदार आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मंगेश चिवटे यांनी शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर फलटण येथे झालेल्या विजय संकल्प सभेतून त्यांच्या उमेदवारीला स्थानिक पातळीवरही पाठबळ देण्याची भूमिका स्पष्ट झाली.
यावेळी मंगेश चिवटे यांनीही “मी लढणार आणि जिंकणारच; कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही,” असा ठाम निर्धार व्यक्त केला. त्यामुळे पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मंगेश चिवटे यांच्या लढ्याबाबतचा संदेश फलटणच्या सभेतून अधिक स्पष्ट झाला.
सभेला फलटण तालुक्यातील शिक्षक बांधव, महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.