*सहकार शिरोमणीच्या विजयाची दोरी आमच्याकडे *  *कर्मवीर औदुंबरआण्णा पाटील  गटाच्या बैठकीत युवराज पाटील यांची स्पष्टोक्ती  *येत्या ५जूनला आपला पाठिंबा करणार जाहीर*

*सहकार शिरोमणीच्या विजयाची दोरी आमच्याकडे *   *कर्मवीर औदुंबरआण्णा पाटील  गटाच्या बैठकीत युवराज पाटील यांची स्पष्टोक्ती   *येत्या ५जूनला आपला पाठिंबा करणार जाहीर*

पंढरपूर,/प्रतिनीधी

सध्या सहकार शिरोमणी वसंतराव काळे सह साखर कारखान्याची निवडणूक सुरू आहे. यामध्ये कोण आणि किती उमेदवार निवडणुकीत उभा राहणार याबाबत आपल्याला देणेघेणे नाही. मात्र या निवडणुकीत कोणत्या पॅनलला विजयी करायचे यासाठी लागणारा मताचा आकडा मात्र आमच्या आण्णा -भाऊ गटाकडे नक्की आहे. त्यासाठी नेमका पाठींबा कोणाला द्यायचा यासाठी आम्ही अजून एक बैठक घेऊन ठरविणार आहोत. याबाबतचा अंतिम निर्णय येत्या ५जून ला जाहीर करणार असल्याची माहिती कर्मवीर औदुंबरआण्णा पाटील गटाचे प्रमुख युवराज पाटील यांनी दिली आहे.
      मागील वर्षी पार पडलेल्या विठ्ठलचे निवडणुकीत याच गटाने दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली होती. यामुळे विठ्ठल परिवारातील हा महत्वाचा गट आहे.


      विठ्ठल परिवारातील महत्वाची संस्था असलेल्या या सहकार शिरोमणी साखर कारखान्याची निवणुडक चालू आहे. यामुळे विठ्ठल परिवारासह तालुक्यातील राजकिय वातावरण आरोप प्रत्यारोपाने ढवळून निघाले आहे. यामधे या गटाची भूमिका महत्वाची आहे. भालके गटाने तर विद्यमान चेअरमन काळे गटाला साथ देण्याचे जाहीर केले आहे. हा गट काय करणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.
    रविवारी युवराज पाटील यांनी याबाबत विठ्ठल हॉस्पिटल येथे आपल्या प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली होती. यामध्ये सहकार शिरोमणीचे निवडणुकीत काय भूमिका घ्यावी. याबाबत विचार विनिमय बैठक घेण्यात आली. यामध्ये वेगवेगळे मतप्रवाह पहावयास मिळाले. यामुळे अंतिम निर्णय घेण्यासाठी अडचण निर्माण झाली. त्यामुळे पुढील एका बैठकीत योग्य दिशा ठरविण्याचा निर्णय घेण्यात आला.
    असे असले तरी युवराज पाटील यांनी मात्र आपल्या भाषणात या निवडणुकीत आपले विचाराचे असलेले ऍड दिपक पवार यांना पाठिंबा देण्याबाबत भूमिका स्पष्ट केली. यामध्ये त्यांनी भूमिका मांडताना एक प्रमुख अट घातली आहे. दिपक पवार यांनी या निवडणुकीत स्वतंत्र पॅनल उतरवल्यास पाठिंबा पक्का असल्याचे सांगितले आहे. यामुळे ऍड दिपक पवार यांची मोठी कोंडी झाली आहे.
 काही वेळानंतर ऍड दिपक पवार यांनीही या बैठकीला उपस्थिती लावली. आपल्या भूमिकेबद्दल त्यांनीही स्पष्ट सांगितले. युवराज पाटील हे आपले नेते आहेत. विठ्ठलचे निवडणुकीत मला प्रलोभने असतानाही आम्ही त्यांच्या पाठीशी उभा राहिलो. त्याच पद्धतीने माझ्या पाठीशी आता आपणही या सहकार शिरोमणी निवडणुकीत राहावे अशी विनंती केली. मागील निवडणुकीत काळे यांच्या विरोधात दोन पॅनल असल्यानेच काळे यांना सत्ता राखता आली. ती चूक आता होऊ नये यासाठी काळे विरोधात सगळे. हीच भूमिका सर्वांनी घ्यावी अशी सभासद वर्गातून मागणी होत आहे. त्यामुळे मला आता स्वतंत्र पॅनल लावण्यापेक्षा काळे यांना हटवण्यासाठी आघाडी करून लढावे लागणार आहे. असे स्पष्ट सांगून टाकले. त्यासाठी आण्णा भाऊ पॅनल पॅनलच्या सर्व नेत्यांनी माझ्यासाठी एकत्रित यावे असे आवाहन दिपक पवार यांनी केले.
     वरील बैठकीत कार्यकर्त्यांनीही वेगवेगळे मतप्रवाह असणारे विचार मांडले.यामुळे यावेळी निर्णय अर्धवट राहिला आहे.

चौकट

विठ्ठलच्या निवडणुकीची तक्रार दाखल

मागील वर्षी झालेल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत मतमोजणीबाबत आपण
सहकार कोर्टात दाद मागितली आहे. याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आपले म्हणणे सादर केले असून याबाबत लवकरच निर्णय होईल असेही युवराज पाटील यांनी सांगितले आहे.त्यामुळे हा आणखी नव्याने विषय विठ्ठल परिवारासाठी चर्चेचा विषय बनला आहे.