सोलापूर जिल्ह्यातील विविध भागात अतिवृष्टीमुळे तसेच वारंवार आलेल्या पुराचा मोठा फटका बसला आहे.पिकांचे मोठे नुकसान झाले आहे,सतत होणाऱ्या अतिवृष्टीमुळं होत्याचे नव्हते झाले आहे.पंढरपूर तालुक्यातही अतिवृष्टीमुळे द्राक्ष,डाळींब,केळी बागा तसेच इतरही अनेक भुसार पिके उध्वस्त झाले आहेत.मात्र २४ तासात ६५ मिलीमीटर पावसाच्या निकषामुळे भरपाई मिळण्यापासून शेतकरी वंचित राहण्याचा धोका उत्पन्न झाला आहे.पंढरपूर तालुक्यातील भाळवणी भागात मागील तीन महिने सातत्याने धोधो पाऊस पडला असून अनेक वेळा ओढे नाले भरून वाहिले आहेत.अनेक रस्ते बंद झाल्याचे दिसून आले आहे.मात्र तरीही भाळवणी परिसरात पंचनामे करण्यास प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात असल्याचा अनुभव या भागातील अनेक शेतकऱ्यांना येऊ लागला आहे.
सोलापूर जिल्ह्यात सीना नदीकाठ व भीमा नदी काठच्या शेतकऱ्यांना वारंवार पुराचा फटका बसला आहे.नदीकाठच्या परिसरात ऊस पिकाचे पाणी साठून कुजून नुकसान झाले आहे.तर अनेक पिके नष्ट झाली आहेत. पिके, घरे, पशुधन तर गेलेच आहे, पण जमीन साफ खरवडून गेली आहे.आणि या साऱ्या संकटातून शेतकऱ्यांना उभारी देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांना भरीव मदत करणे गरजेचे झाले आहे. केंद्र सरकारने स्वतंत्र रित्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत केली पाहिजे तर राज्य सरकारने निवडणुकीवेळी दिलेला शब्द पाळत कर्जमाफी केली पाहिजे तसेच मागील तीन महिन्यात झालेल्या सतत अतिवृष्टीमुळे भाळवणी तसेच भंडीशेगाव सर्कल तसेच तालुक्यातील इतरही गावे नुकसानीच्या पंचनाम्यापासून वंचित आहेत तेथे त्वरित पंचनामे करावेत या मागणीसाठी पंढरपूर तहसील कार्यालयासमोर बुधवार दिनांक ८ रोजी सकाळी ११ वाजता उग्र निदर्शने करून निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पंढरपूर विभाग जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांनी दिली आहे.
तसेच भंडीशेगाव सर्कल मधील सर्व अतिवृष्टीग्रस्त शेतकरी बांधवानी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांनी केले आहे