लॉकडाऊन सोबत अर्थव्यवस्थेचाही विचार करा  अनंत गाडगीळ यांचे राज्य सरकारला आवाहन

लॉकडाऊन सोबत अर्थव्यवस्थेचाही विचार करा   अनंत गाडगीळ यांचे राज्य सरकारला आवाहन

पंढरपूर (प्रतिनिधी)

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात लॉकडाऊन पुकारण्यात आला आहे.परिस्थितीनुसार यामध्ये वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या परिस्थितीतून जात असताना अर्थव्यवस्थेचाही विचार करणे गरजेचे आहे. अर्थव्यवस्था खिळखिळी होऊ नये यासाठी उपाययोजना कराव्यात असे आवाहन माजी आ.अनंत गाडगीळ यांनी केले आहे.

आरोग्य तसेच इतर संबंधित क्षेत्रातील तज्ञांच्या सल्यानुसार, महाराष्ट्र शासनाने यापूर्वी लॉकडाऊन जाहीर केला. आता त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. तथापि गेल्या ११ महिन्यामध्ये ४ महिने बाजारपेठा, दुकाने, व्यवसाय पूर्णतः बंद राहिले आहेत. यामुळे राज्याचे आणि नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. 
आरोग्य व मनुष्यजीव हा महत्वाचा आहेच. मात्र, आर्थिक स्थिती पूर्वपदावर यायला किमान २ वर्षे लागणार आहेत. हे नजरेआड करून चालणार नाही. कोरोना संपूर्णपणे नष्ट होण्यास बराच काळ लागणार असल्याचे मत विविध तज्ञ व्यक्त करीत आहेत.यावर कायम लॉकडाऊन ठेवणे शक्य नाही. यावर उपाय म्हणून, स्वतः शहर नियोजन तज्ञ असलेल्या काँग्रेसचे मा. आ. अनंत गाडगीळ यांनी राज्य सरकारला आवाहन केले आहे.


 ज्या शहरात अथवा जिल्ह्यात कोरोनाचे प्रमाण कमी होत चालले आहे तेथील दुकाने किमान आठवड्यातून १ वा २ दिवस अर्धा दिवस उघडण्याची परवानगी द्यावी  यामध्ये अर्ध्या दुकानांना मंगळवारी व उरलेल्या दुकानांना शुक्रवारी उघडे ठेवण्याची परवानगी द्यावी.  बाजारपेठेचे भाग पाडून पार्किंगप्रमाणे विभागवार "पी वन-पी टू" करून परवानगी द्यावी. परिस्थिती आणखी जशी सुधारेल त्याप्रमाणे एक-एक दिवस वाढवावा.

 मुंबई-पुण्यामध्ये वैयक्तिक व सार्वजनिक कार्यालयांना विभागवार आलटून-पालटून सुरु करण्याची, कालांतराने परवानगी द्यावी. मुंबई-पुण्यामध्ये कार्यालयीन वेळेत बदल करावा  ही सूचना १९९७ सालीच एका प्रसिद्ध इंग्रजी वृत्तपत्रातील आपल्या लेखमालिकेतून केली होती. याबाबतची अमलबजावणी केल्यास राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असेही गाडगीळ यांनी म्हटले आहे.