उंबरे गावठाण आणि गायरान अतिक्रमण  प्रकरणी आता वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच लक्ष घालणे गरजेचे!* *राष्ट्रवादीचे म्हणतात गायरान  ,तर प्रहारचे म्हणतात गावठाण प्रश्न मिटवा,* *वरील दोन्हीही जमिनीची तात्काळ मोजणी केल्यास पेटलेल्या वादावर पडणार पडदा*

उंबरे गावठाण आणि गायरान अतिक्रमण  प्रकरणी आता वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच लक्ष घालणे गरजेचे!*  *राष्ट्रवादीचे म्हणतात गायरान  ,तर प्रहारचे म्हणतात गावठाण प्रश्न मिटवा,* *वरील दोन्हीही जमिनीची तात्काळ मोजणी केल्यास पेटलेल्या वादावर पडणार पडदा*


 पंढरपूर (प्रतिनिधी)

सरकारी जमिनींवर करण्यात आलेल्या अतिक्रमणाचा मुद्दा, पंढरपूर तालुक्यातील उंबरे गावात गाजत आहे. तब्बल ९८ एकर सरकारी जमिनींवरील हे अतिक्रमण काढण्याची मानसिकता येथील ग्रामसभेने दाखवली आहे. ज्यांच्यावर अतिक्रमणाचे आरोप झाले, त्या गावपुढाऱ्यांनीही यासाठीची तयारी दाखवली आहे. येथील अतिक्रमण हटविण्यासाठीची सारी भिस्त आता प्रशासनावर येऊन पडली आहे. याप्रकरणी येथील नागरिकांची नजर आता, पंढरपूरचे तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे लागली आहे.


पंढरपूर तालुक्यातील उंबरे गावातील गावठाण आणि गायरान अशा, ९८ एकर जमिनींवर नागरिकांनी अतिक्रमण केले असल्याचे प्रकरण नुकतेच उघडकीस आले आहे. येथील गांव पुढाऱ्यांनी एकमेकांवर आरोप करीत , सरकारी जमीन हडपल्याचा प्रकार उघडकीस आणला होता. या आरोप-प्रत्यारोपाच्या फैरीतून हे अवघड प्रकरण सोपे झाले आहे. येथील अतिक्रमण काढण्यासाठी ग्रामसभेने ठराव करून, यापूर्वीच आपली संमती दाखवून दिली आहे.

चार दिवसांपूर्वी प्रहार शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष, नाना इंगळे तसेच जिल्हा संघटक, बापू मोहिते यांनी, येथील राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष शहाजी मुळे यांच्यावर आरोप केले होते. त्यांनी ४ एकर गावठाण हडप केल्याचा दावा करून, संबंधित अतिक्रमण काढण्यासाठी आंदोलन केले होते. पंढरपूर पंचायत समिती समोर करण्यात आलेल्या या आंदोलनाने, हा प्रकार समोर आला होता. यानंतर अवघ्या दोनच दिवसांनी राष्ट्रवादी नेते शहाजी मुळे यांनी येथील तहसील कार्यालयासमोर उपोषण करून, प्रहार संघटनेचे बापू मोहिते यांनी ३ एकर गायरान हडपल्याचा आरोप केला होता. हे गायरान अतिक्रमणमुक्त करण्याची मागणी केली होती. या परस्परविरोधी आंदोलनांमुळे, उंबरे येथील सरकारी जमिनींवरील अतिक्रमणाचा मुद्दा तीव्र बनला होता. उंबरे गावात चांगलाच चर्चेत आला होता.


 काही दिवसांपूर्वीच येथील ग्रामसभेने ठराव करून गायरान अतिक्रमण मुक्त करण्याची मागणी केली होती. यासंदर्भात तहसीलदारांनी गायरानाची मोजणी करण्यासाठी, भुमी अभिलेख कार्यालयास आदेश दिले आहेत. याचवेळी गावठाणाची मोजणी करून येथील अतिक्रमण हटवण्याची मोहीम तीव्र झाली होती. प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी, या मोजणीसाठी हालचाली केल्या होत्या. या दोन्ही आंदोलनावेळी प्रशासनाने हा मुद्दा ठराविक काळात निकाली काढण्याचे आश्वासन दिले होते. याच वेळी परस्परविरोधी आरोप करणाऱ्या गाव पुढाऱ्यांनीही आपले पत्ते खोलले आहेत. येथील गायरान तसेच गावठाणावरील अतिक्रमण करण्यास आपला विरोध नाही, असे सांगून त्यांच्यावरील आरोप धुडकावून लावले आहेत. या प्रकरणाने येथील सरकारी जमिनींवरील अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमेस गती येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. आता प्रशासनाने ठाम भूमिका घेतल्यास, येथील सरकारी जमिनी अतिक्रमण मुक्त होणार असल्याचे दिसून येत आहे. यासाठी येथील तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेण्याची गरज असल्याचे मत , येथील नागरिकांमधून व्यक्त केले जात आहे.


चौकट

उंबरे गावातील गायरानात अतिक्रमणे होऊन येथील गायरानात संपुष्टात आले आहे. या गायरानात वसलेली घरे सोडून, इतर गायरान अतिक्रमण मुक्त करण्यात शासनाने पुढाकार घ्यावा. यास प्रहार संघटनेचा नक्कीच पाठिंबा राहील.

नाना इंगळे ,
तालुकाध्यक्ष,
 प्रहार शेतकरी संघटना.


चौकट

आपणावर झालेले आरोप धादांत खोटे आहेत. आपण गायरान जमीन हडपली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रशासनाने यात लक्ष घालून याचा छडा लावावा, आपणाकडे तसूभरही गायरानातील जमीन निघाल्यास, आपण ही सोडून देण्यास तयार आहोत. प्रशासनाने याकामी पुढाकार घ्यावा.

बापू मोहिते
जिल्हा संघटक,
प्रहार शेतकरी संघटना.


चौकट

राजकीय द्वेषापोटी आणि गावातील राजकारण मनात ठेवून, आपणास टारगेट केले जात आहे. आपण गावठाणातील जमिनींवर अतिक्रमण केल्याचा आरोप निराधार आहे. प्रशासनाने गावठाणाची मोजणी करावी. आपणाकडे गावठाणाची जमीन आल्यास, त्याच क्षणी ही जमीन सोडण्यास आपण तयार आहे . गावठाणात अतिक्रमण करून राहिलेल्या नागरिकांची घरे पडण्याचा आपला कोणताही मनोदय नाही.

शहाजी मुळे,
जिल्हा उपाध्यक्ष ,
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी.