*मोहिते पाटील यांच्या हस्ते डॉ रोंगेसर यांचा सन्मान* *स्वेरी मध्ये उच्च शिक्षण संस्था चालकांच्या सेवाभावी संस्थेची बैठक संपन्न*  

*मोहिते पाटील यांच्या हस्ते डॉ रोंगेसर यांचा सन्मान*  *स्वेरी मध्ये उच्च शिक्षण संस्था चालकांच्या सेवाभावी संस्थेची बैठक संपन्न*  

पंढरपूर/प्रतिनिधी 

गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मध्ये मंगळवार दि. २६ जुलै रोजी शिक्षण संस्थाचालकांच्या सेवाभावी संस्थेची बैठक  संपन्न झाली. 
            बैठकीच्या अध्यक्षस्थानी  पद्मजादेवी मोहिते-पाटील या होत्या तर या बैठकीस सोलापूर जिल्ह्यातील उच्च शिक्षण संस्थाचालकांच्या संघटनेचे सदस्य उपस्थित होते. यावेळी संघटनेचे सचिव प्राचार्य डॉ.जयप्रकाश बिले यांनी ‘शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भरती प्रक्रिया शासनाकडून लवकरात लवकर करावी यासाठी  दिनांक ७ ऑगस्ट, २०२२ रोजी बार्शीतील छत्रपती शिवाजी महाविद्यालय येथे होणाऱ्या संस्थाचालकांच्या बैठकीत सदरचा विषय उपस्थित करून माननीय उच्च न्यायालयात भरती संदर्भात दाद मागण्याचे सर्वानुमते ठरले. तसेच ‘वेगवेगळ्या विद्यापीठ स्तरावर संस्थाचालकांच्या ज्या विविध संघटना आहेत त्यांचे एकत्रीकरण करून महाराष्ट्रासाठी एक स्वतंत्र संघटना स्थापन करावी’ असेही सर्वानुमते ठरले. सदरची जबाबदारी ‘संघटनेचे सचिव प्राचार्य डॉ.जयप्रकाश बिले व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ.बी. पी. रोंगे यांनी घ्यावी.’ असे सर्वानुमते ठरले. यावेळी उच्च शिक्षणात उत्कृष्टता प्राप्त करण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० समजून घेणे आणि त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन केले होते. यामध्ये शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरचे माजी कुलगुरू डॉ. ए. एस. भुईटे, भाभा अणुसंशोधन केंद्राचे जेष्ठ शास्त्रज्ञ व रसायनशास्त्र विभागाचे माजी संचालक प्रा.बी.एन.जगताप व शिक्षणतज्ञ प्रा.आनंद मापुसकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उच्च शिक्षण संस्थाचालकांच्या सेवाभावी संस्थेच्या वतीने वेणुनगर (गुरसाळे, ता. पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्याबद्धल व व्हाईस चेअरमनपदी निवड झाल्यामुळे स्वेरीच्या विश्वस्त प्रेमलता रोंगे यांचा सत्कार संघटनेच्या अध्यक्षा श्रीमती पद्मजादेवी मोहिते-पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.  स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी सदरच्या बैठकीचे उत्तमरीत्या आयोजन  केल्याबद्दल त्यांचा संघटनेचे सचिव प्राचार्य. जयप्रकाश बिले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सदरच्या बैठकीस कार्याध्यक्ष बाबूराव गायकवाड, सहसचिव दशरथ गोप, माढा तालुक्याचे माजी आमदार विनायकराव पाटील, चंद्रकांत देशमुख सांगोला डॉ.मगण सुरवसे कुर्डुवाडी, जय कुमार शितोळे बार्शी, अजिंक्य राणा पाटिल मोहोळ, भिमराव पाटिल मंगळवेढा, पी टी पाटिल बार्शी,  दीपक खटकाळे सांगोला व अनेक  महाविद्यालयाच्या संस्थांचे  अध्यक्ष व प्रचार्य उपस्थित होते. बैठकीचे नियोजन प्राचार्य जयप्रकाश बिले यांनी केले.