*तावडीतून निसटले पण  ...  गुन्ह्यात अडकलेच* *पळ काढणाऱ्या आंबे येथील वाळू चोरांवर गुन्हा दाखल* *मंडळ अधिकारी सुरवसे यांच्याकडून कारवाईचा धडाका सुरूच*

*तावडीतून निसटले पण  ...  गुन्ह्यात अडकलेच*  *पळ काढणाऱ्या आंबे येथील वाळू चोरांवर गुन्हा दाखल*  *मंडळ अधिकारी सुरवसे यांच्याकडून कारवाईचा धडाका सुरूच*

पंढरपूर (प्रतिनिधी)

महसूल कर्मचाऱ्यांच्या तावडीतून निसटून पळ काढणाऱ्या, आंबे येथील दोन वाळू चोरांवर वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे . आंबे परिसरात गुरुवारी करण्यात आलेल्या या कारवाईने, येथील वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत. चळे मंडळाचे मंडल अधिकारी संतोष सुरवसे यांनी वाळू चोरांवर कारवाईचा धडाका सुरूच ठेवला आहे . येथील वाळू चोरांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे.


पंढरपूर तालुक्यातील आंबे , सरकोली या भागात होणारी वाळू चोरी नेहमीच चर्चेत असते . आंबे येथे अनेक दिवसापासून वाळूमाफियांनी धुडगूस घातला
 आहे . यावर मंडल अधिकारी संतोष सुरवसे यांनी आपली वक्रदृष्टी फिरवली आहे . मागील आठवड्यात केलेल्या कारवाईनंतर, आता दुसरी कारवाई केली आहे . वाहनासह पळ काढणाऱ्या वाळू चोरांना कायद्याच्या कचाट्यात अडकवले आहे .


मागील काही दिवसांपूर्वी केलेल्या कारवाईनंतर ,मंडळ अधिकारी सुरवसे यांनी याच परिसरात दुसरी कारवाई केली आहे .गुरुवार दि.१२ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास सुरवसे यांना अज्ञात इसमाने , भीमा नदी पत्रातून वाळू चोरून चारचाकी वाहन सरकोली मार्गे मंगळवेढाकडे जात असल्याचे कळविले. यावर तातडीने सरकोली गावचे तलाठी आप्पा काळेल तसेच चळे गावचा कोतवाल महादेव नारायण बंडगर यांना सोबत घेऊन सुरवसे यांनी सदर मार्गावर सापळा लावला. ओझेवाडी सरकोली सीमेलगत रस्त्यावर आले असता, त्यांना समोरून येणारा पांढऱ्या रंगाचा अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो दिसून आला . सदर टेम्पो चालकास इशारे करून थांबविण्याचा प्रयत्न करण्यात आला. सदर वाहन चालकाने टेम्पो रस्त्याच्या बाजूला घेतला. यावेळी टेम्पो मध्ये सुमारे पाऊणतास वाळू असल्याचे दिसून आले . सदर वाहन चालकास महसूल विभागाचे कर्मचारी असल्याचा संशय आल्याने त्याने टेंपो  भरधाव वेगाने पळवून , मंगळवेढ्याच्या दिशेने पोबारा केला .याबाबत चौकशी करण्यात आली . चौकशीअंती सदर वाहन चालकाचे नाव सुधीर दत्तात्रय वाघमारे (रा. आंबे) तर टेम्पोच्या मालकाचे नाव हर्षवर्धन हरी रानमर( रा. आंबे ) असल्याचे समजून आले . या घटनेतील दोन्ही वाळू चोरांवर पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला . वाळूचोरी करून पळ काढणाऱ्या या दोघांवर,  सरकोली गावचे तलाठी आप्पा काळेल यांच्या फिर्यादीनुसार , भादवि कलम ३७९, ३४ सह गौणखनिज कायदा १९७८ च्या कलम ४१ (४)( क )(  १)तसेच २१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .


चौकट

पंढरपूर तालुक्यातील आंबे येथील वाळू चोरीस लगाम घालण्याचे काम महसूल विभागाने हाती घेतले आहे मंडळ अधिकारी संतोष रामचंद्र सुरवसे यांनी वाळू चोरांवर कारवाई करण्याचा धडाका सुरूच ठेवला आहे दोन दिवसापूर्वी केलेल्या कारवाईनंतर आता पुन्हा वाळू चोरी करून पळ काढणाऱ्या दोन वाळू चोरांना कायद्याच्या कचाट्यात अडकवले आहे