*शिक्षण समितीच्या बैठकीत गणवेश अनुदानवाढ, शाळांच्या गुणवत्तेसाठी महत्त्वपूर्ण निर्णय,भरारी पथकाची घोषणा* *शेळकेवाडी(शिवणे ) जि. प. शाळा पॅटर्न जिल्हाभर राबविणार असल्याची सभापती चेतनसिंह केदार सावंत यांची घोषणा*
सांगोला /:प्रतिनिधी
देशपातळीवर उल्लेखनीय कामगिरी करून महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा परिषद शाळा म्हणून गौरव मिळविलेल्या सांगोला तालुक्यातील शेळकेवाडी (शिवणे) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जिल्हा परिषद सोलापूरच्या शिक्षण व आरोग्य समितीची मासिक बैठक पार पडली. भाजप जिल्हाध्यक्ष तथा सोलापुर जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती चेतनसिंह केदार-सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना अधिक सक्षम सुविधा देण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
बैठकीत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षातील शिक्षण विभागाच्या खर्चास मंजुरी देण्यात आली. प्राथमिक, माध्यमिक आणि योजना विभागाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. विद्यार्थ्यांना वेळेत पाठ्यपुस्तके, गणवेश, मुलींसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच जिल्ह्यातील शाळांच्या दुरुस्ती व बांधकामांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित विभागाला देण्यात आले. बैठकीतील सर्वाधिक महत्त्वाचा निर्णय म्हणजे शालेय गणवेशासाठीचे अनुदान ₹३०० वरून ₹५०० करण्याचा ठराव. तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या उपस्थिती भत्त्यात ₹१ वरून ₹५ प्रतिदिन वाढ करण्यास समितीने मंजुरी दिली. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना आणि ‘माझी शाळा’ उपक्रमाचाही आढावा घेण्यात आला. SHVR उपक्रमांतर्गत राष्ट्रीय स्तरावर यश संपादन करून राज्याचा मान उंचावणाऱ्या शेळकेवाडी जिल्हा परिषद शाळेच्या अभिनंदनाचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. विद्यार्थ्यांनी वारकरी दिंडी, टाळ-मृदुंग आणि हरिनामाच्या गजरात केलेल्या स्वागताने बैठकीला संस्कार आणि परंपरेची अनोखी जोड मिळाली.
“शेळकेवाडीचा आदर्श आता संपूर्ण जिल्ह्यासाठी” या भूमिकेतून समितीने शिक्षणाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड न करण्याचा निर्धार व्यक्त केला. प्रत्येक शाळेच्या कामकाजावर नियमित देखरेख ठेवण्यासाठी विशेष भरारी पथक स्थापन करण्यात येणार असून, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शाळा व शिक्षकांचा गौरव आणि आवश्यक ठिकाणी कठोर सुधारणा उपाययोजना राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा अध्यक्ष तथा सोलापुर जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती l चेतनसिंह केदार-सावंत यांनी दिली.
बैठकीस सांगोला पंचायत समिती सभापती पुनमताई इंगवले, उपसभापती अजय सरगर, शिक्षण समिती सदस्य सौ. दिपाली ताड, चंद्रकांत जाधव, सौ. वंदना कांबळे, सौ. श्रुती भोरगुंडे, माजी सभापती शिवाजी कांबळे, शिक्षणाधिकारी कादर शेख, शिक्षण विभागातील अधिकारी, जिल्ह्यातील गटशिक्षणाधिकारी, कर्मचारी तसेच शेळकेवाडी शाळेचे शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
*चौकट*
देशपातळीवर उल्लेखनीय यश संपादन करून महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा परिषद शाळा म्हणून नावलौकिक मिळवलेल्या शेळकेवाडी (शिवणे ) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा आदर्श आता संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. शिक्षणाची गुणवत्ता उंचावण्यासाठी विशेष भरारी पथक स्थापन करून जिल्ह्यातील सर्व शाळा आणि शिक्षकांच्या कामकाजाचे नियमित निरीक्षण करण्यात येणार आहे. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शाळा व शिक्षकांचा गौरव केला जाईल, तर ज्या ठिकाणी सुधारणा आवश्यक आहे तेथे तातडीने आवश्यक उपाययोजना राबविण्यात येतील. प्रत्येक विद्यार्थी सक्षम, प्रत्येक शाळा आदर्श आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण हीच जिल्हा परिषदेची प्राथमिकता असल्याचे शिक्षण समितीच्या बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
*सभापती चेतनसिंह केदार-सावंत*