*शिक्षण क्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी शिक्षकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार - मा. आमदार दत्तात्रय सावंत* *आदर्श शिक्षक व शाळा पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न*
पंढरपूर |प्रतिनिधी
"शिक्षण हे सर्व विकासाचे मूळ आहे. समाजाला दिशा देण्याचे काम शिक्षक करत असतात, त्यामुळे त्यांच्या रास्त मागण्यांसाठी आणि हक्कासाठी लढणे ही आपली जबाबदारी आहे. जुनी पेन्शन योजना, टीईटी (TET) सक्ती आणि टप्पा अनुदान यांसारख्या शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी मी नेहमीच शिक्षक बांधवांसोबत खांद्याला खांदा लावून उभा आहे, व यानंतरही कायम शिक्षकांसोबत उभा असेल अशी ग्वाही पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी दिली.
सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक व सेवक सहकारी पतसंस्थेच्या वतीने भोसे (ता. पंढरपूर) येथे आयोजित गौरव सोहळ्यात ते बोलत होते.
या कार्यक्रमात पंढरपूर, माळशिरस, माढा व करमाळा या चार तालुक्यातील आदर्श शिक्षक, शाळा आणि मुख्याध्यापकांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल माजी आमदार सावंत यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
यावेळी बोलताना उपस्थितांनी दत्तात्रय सावंत यांच्या मागील आमदारकीच्या कार्यकाळातील योगदानाची आठवण काढली. आपल्या कार्यकाळात सावंत यांनी शिक्षण क्षेत्रातील असंख्य जटील प्रश्न लोकशाही व प्रशासकीय मार्गाने शासन दरबारी लावून धरले होते. त्यांच्या चिकाटीमुळे आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हजारो शिक्षकांच्या विविध समस्या मार्गी लागल्या होत्या. आजही तेच धारदार नेतृत्व आणि शिक्षकांप्रति असलेली निष्ठा पाहून शिक्षक वर्गातून समाधान व्यक्त केले जात होते.
आपल्या मनोगतात सावंत पुढे म्हणाले की, "शिक्षण क्षेत्रातील सध्याच्या अडचणींमुळे शिक्षकांचे मनोबल कमी होता कामा नये. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित करावे. शिक्षकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी मी केवळ आमदार असतानाच नव्हे, तर कायमच शिक्षक बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. शासनाशी चर्चा करून प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी मी नेहमीच अग्रभागी असेन," असे आश्वासन त्यांनी दिले.
या सोहळ्यात चार तालुक्यांमधून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आदर्श शिक्षक, शाळा आणि मुख्याध्यापकांचा गौरव करण्यात आला. शिक्षकांनी शिक्षण क्षेत्रात दिलेल्या योगदानाची दखल घेऊन पतसंस्थेने घेतलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
यावेळी शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, पतसंस्थेचे पदाधिकारी, शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक व सेवक सहकारी पतसंस्थेच्या वतीने करण्यात आले होते.