*केसकरवाडी येथे सौ. अलका गुजरे-जमदाडे यांचा सेवापूर्ती सत्कार उत्साहात

*केसकरवाडी येथे सौ. अलका गुजरे-जमदाडे यांचा सेवापूर्ती सत्कार उत्साहात

पंढरपूर/प्रतिनिधी

पंढरपूर तालुक्यातील: केसकरवाडी येथील शिक्षिका सौ. अलका महादेव गुजरे-जमदाडे यांनी ३४ वर्षे निष्ठेने, समर्पित भावनेने व विद्यार्थीकेंद्रित दृष्टीकोनातून शैक्षणिक सेवा बजावल्यानंतर सेवानिवृत्त होत असल्याने त्यांच्या सेवापूर्ती सत्कार समारंभाचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले.

समारंभाच्या अध्यक्षस्थानी श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. कल्याणरावजी काळे होते. त्यांनी सौ. अलका गुजरे-जमदाडे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत त्यांच्या प्रदीर्घ व उल्लेखनीय शैक्षणिक सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि निवृत्तीनंतरच्या निरोगी, आनंदी व समाधानमय आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे शिक्षण संचालक मा. श्री. गंगाधर म्हमाणे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री. बाळासाहेब काळे गुरुजी, पंचायत समिती सदस्य श्री. विजय शिंदे, शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. संभाजी राजे शिंदे, माजी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष श्री. दीपक दादा पवार, श्री. इ. बा. मुलाणी गुरुजी, सहकार शिरोमणीचे संचालक श्री. सुनील पाटील, भाळवणीचे सरपंच श्री. रणजीत जाधव, केसकरवाडीचे सहकारी श्री. तानाजी केसकर, श्री. संजय मासाळ, केसकरवाडीचे सरपंच श्री. प्रकाश केसकर, शिक्षक नेते श्री. रामभाऊ यादव यांच्यासह अनेक मान्यवर, शिक्षकवृंद, माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मान्यवरांनी आपल्या मनोगतातून सौ. अलका गुजरे-जमदाडे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या कार्याचा गौरव केला. त्यांच्या शिस्तप्रिय, विद्यार्थीहितैषी व कर्तव्यनिष्ठ सेवेमुळे अनेक विद्यार्थ्यांचे आयुष्य घडल्याचे सांगत त्यांच्या कार्याला सलाम केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाधान काळे यांनी केले, तर हणमंतराव जमदाडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.