*गंभीर दुष्काळी परिस्थितीतही शेतकऱ्यांना सरकारने अतिनियम घालण्याच्या भानगडीत पडू नये* *जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आ.अभिजीत पाटलांनी  उठवला आवाज*

*गंभीर दुष्काळी परिस्थितीतही शेतकऱ्यांना सरकारने अतिनियम घालण्याच्या भानगडीत पडू नये*  *जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आ.अभिजीत पाटलांनी  उठवला आवाज*

पंढरपूर/प्रतिनिधी: 

सोलापूर जिल्ह्यासह माढा विधानसभा मतदारसंघावर दुष्काळाचे सावट अधिक गडद होत असून पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी गंभीर संकटात सापडला आहे. शेतातील उभी पिके पाण्याअभावी करपू लागली असून अनेक गाव-वाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर ‘नियम-अटींच्या कचाट्यात शेतकऱ्यांना अडकवू नका; तातडीने पाणी उपलब्ध करून द्या,’ अशी ठाम मागणी आमदार अभिजीत आबा पाटील यांनी केली. त्यास पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे यांनी सकारात्मक आश्वासन दिले.

सोलापूर येथील नियोजन भवनात पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत टंचाई आढावा बैठक पार पडली. यावेळी माढा मतदारसंघासह संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात निर्माण होत असलेल्या टंचाईच्या परिस्थितीकडे आ. अभिजित पाटील यांनी शासनाचे लक्ष वेधले. गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेकांच्या घरांचेही नुकसान झाले असून शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला. त्या संकटातून सावरण्याची संधी मिळण्यापूर्वीच यंदा पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांवर पुन्हा संकट कोसळले आहे.
सध्या अनेक भागांत पिकांना पाण्याची नितांत गरज असताना उपलब्ध पाणीसाठे मर्यादित होत आहेत. शेतातील उभी पिके वाचविण्यासाठी शेतकरी धडपडत असून पावसाची प्रतीक्षा कायम आहे. दुसरीकडे गाव-वाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची आवश्यकता भासू लागली आहे. जनावरांसाठी चारा आणि पाण्याची उपलब्धता हा देखील गंभीर प्रश्न बनत चालला आहे.

टंचाईच्या परिस्थितीचा आढावा घेताना केवळ बैठका, पंचनामे, अहवाल आणि कागदावरील आकडे यावर समाधान न मानता प्रशासनाने प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन परिस्थिती पाहण्याची गरज असल्याचे आ. अभिजित पाटील यांनी स्पष्ट केले.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केवळ चर्चा करून वेळकाढूपणा न करता तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी आ. पाटील यांनी बैठकीत केली. पिकांना आवश्यक पाणी, गाव-वाड्यांतील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, तसेच जनावरांसाठी चारा व पाण्याची उपलब्धता याबाबत प्रशासनाने तत्काळ कार्यवाही करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीच्या संकटातून आर्थिकदृष्ट्या सावरण्यापूर्वीच यंदाच्या अपुऱ्या पावसाने शेतकरी पुन्हा अडचणीत आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत देताना प्रत्यक्ष परिस्थितीचा विचार करून निर्णय घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला नियम-अटींच्या फेऱ्यात न अडकवता शासनाने तातडीने मदतीचा हात द्यावा,” अशी ठाम भूमिका आ. अभिजित पाटील यांनी मांडली. सोलापूर जिल्ह्यातील टंचाईची परिस्थिती लक्षात घेता प्रशासनाकडून आता कोणत्या उपाययोजना केल्या जातात आणि शेतकऱ्यांच्या पाणीप्रश्नावर कितपत तातडीने निर्णय घेतला जातो, याकडे शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.

*.....चौकट....*

“शेतकऱ्यांसमोर आज पीक वाचविण्याचे मोठे संकट उभे आहे. पिके करपत आहेत, जनावरांच्या चाऱ्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे. त्यामुळे बैठका, पंचनामे, अहवाल आणि कागदावरील आकडे पुरेसे नाहीत. प्रत्यक्ष शेताच्या बांधावरची परिस्थिती पाहून तातडीने निर्णय घेणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना नियम-अटी लावून अडवू नका; त्यांना पाणी द्या आणि त्यांचे पीक वाचवा.”

--आमदार अभिजीत पाटील, 
माढा विधानसभा