*एमआयटी विश्वशांती गुरुकुलमध्ये विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती*

*एमआयटी विश्वशांती गुरुकुलमध्ये विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती*

पंढरपूर: प्रतिनिधी 

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने वाखरी, पंढरपूर येथील एमआयटी विश्वशांती गुरुकुल स्कूलमध्ये पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मिती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना लाल मातीपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती  बनविण्याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या कल्पकतेला आणि कलागुणांना वाव देत विविध आकर्षक गणेशमूर्ती साकारल्या.
या शिबिरासाठी प्रशालेचे कलाशिक्षक संतोष देशपांडे, पुंडलिक अंकुशराव आणि मुकेश जमादार यांनी विद्यार्थ्यांना  मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांसमोर प्रत्यक्ष गणेशमूर्ती तयार करून दाखवत मूर्ती निर्मितीची विविध तंत्रे समजावून सांगितली. या उपक्रमावेळी शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी गवळी यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचे महत्त्व पटवून देताना ‘सध्याच्या काळात विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाची जाणीव करून देण्यासाठी अशा प्रकारच्या प्रात्यक्षिक आणि कृतीशील शिबिरांची नितांत गरज असल्याचे सांगितले.’
 शाडूची किंवा लाल मातीची गणेशमूर्ती वापरल्यामुळे विसर्जनानंतर जलप्रदूषण कमी होण्यास मदत होते आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यास हातभार लागतो. तसेच लाल मातीमध्ये तुळशीच्या बिया मिसळून गणेशमूर्ती तयार केल्यास विसर्जनानंतर त्यापासून रोप तयार होऊ शकते. या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वृक्षसंवर्धन आणि पर्यावरण रक्षणाची जाणीव निर्माण करण्याचा अभिनव संदेश देण्यात आला.