*एमआयटी विश्वशांती गुरुकुलमध्ये कृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी*

*एमआयटी विश्वशांती गुरुकुलमध्ये कृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी*

पंढरपूर/प्रतिनिधी 

पंढरपूर तालुक्यातील वाखरी येथील एमआयटी विश्वशांती गुरुकुल स्कूलमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा बालगोपाळांचा उत्स्फूर्त सहभागाने मोठ्या उत्साहात संपन्न झाला. भारतीय संस्कृती, सण आणि परंपरा यांची ओळख विद्यार्थ्यांना बालवयातच व्हावी तसेच विविध सण-उत्सवांमागील सामाजिक, सांस्कृतिक व आध्यात्मिक मूल्ये त्यांच्यात रुजावीत या उद्देशाने शाळेत कृष्ण जन्माष्टमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पारंपरिक पोशाखातील श्रीकृष्णरूपी बालगोपाळांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. राधेच्या वेशभूषेतील बालिकांनीही आपल्या मनमोहक रूपाने कार्यक्रमात विशेष रंगत आणली


कार्यक्रमातील प्रमुख आकर्षण ठरलेल्या दहीहंडी उत्सवात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. यावेळी ‘गोपाला गोपाला, देवकीनंदन गोपाला’ या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी गवळी यांनी विद्यार्थ्यांना श्रीकृष्ण जन्माचा प्रसंग अत्यंत रंजक कथारूपाने सांगितला. भगवान श्रीकृष्णांच्या जीवनातील विविध प्रसंगांचा संदर्भ देत “भगवान श्रीकृष्णांच्या जीवनातून आपल्याला सत्याच्या मार्गावर चालण्याची, अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची आणि धर्म व न्यायाचे रक्षण करण्याची प्रेरणा मिळते. विद्यार्थ्यांनीही आपल्या जीवनात सत्य, न्याय आणि सदाचार या जीवनमूल्यांचा अंगीकार करावा” असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. 
उपमुख्याध्यापिका रंजीता चौकेकर यांनी विद्यार्थ्यांना दहीहंडी उत्सवाचे सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व सांगताना ‘दहीहंडी हा केवळ उत्सव नसून, यामुळे एकमेकांविषयी प्रेम, सहिष्णुता, आपुलकी आणि सहकार्याची भावना निर्माण होते.’ असे मत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना मनोरंजनाबरोबरच जीवनमूल्यांचे शिक्षण देण्याचा प्रयत्न करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.