*मा.आमदार दत्तात्रय सावंत यांच्याकडून जुन्या पेन्शनसाठी बैठकांचा धडाका*; *५ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा*
पंढरपूर/प्रतिनिधी
सन २००५ पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी ५ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या आंदोलनात बाधित कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी केले आहे.
राज्यातील अनेक शिक्षक आजही जुन्या पेन्शनपासून वंचित असून, सर्व शिक्षकांनी एकत्र येऊन लढा उभारल्यास हा प्रश्न मार्गी लागू शकतो. म्हणुन १ ते ४ सप्टेंबर या काळात शिक्षकांनी काळ्या फिती लावून शाळेत कामकाज करणे.
५ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मूक मोर्चा काढणे. त्यानंतर सर्व शिक्षक बांधवांनी सहकुटुंब मुंबई येथील आझाद मैदानावर ठाण मांडून बसणे असे या आंदोलनाचे स्वरुप असणार आहे.
या आंदोलनात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, यासाठी माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी जिल्ह्यात बैठकांचा सपाटा लावला आहे. त्यांनी पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला, माळशिरस, बार्शी, माढा, अक्कलकोट आणि सोलापूर शहर येथील शिक्षक बांधवांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्यासोबत बैठका घेतल्या आणि जुन्या पेन्शन योजनेच्या कायदेशीर व लढाऊ भूमिकेबाबत सखोल मार्गदर्शन केले.