*पंढरपूर तालुक्यातील एम. आय. डी. सी. साकार होणे ही काळाजी गरज*- *आ. समाधान आवताडे यांची राज्याचे उद्योग मंत्री ना.उदय सामंत यांच्याकडे मागणी*
पंढरपूर /प्रतिनिधी
गेली अनेक वर्षे पंढरपूर तालुक्यातील राजकीय व व्यावसायिकदृष्ट्या कळीचा मुद्दा म्हणून गाजणाऱ्या एम. आय. डी. सी या औद्योगिक हब चे साकार होणे ही काळाजी असल्याचे प्रतिपादन पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी केले आहे. पंढरपूर तालुक्यातील अर्थिक व रोजगार बाबींना व्यापक रूप देण्यासाठी या तालुक्यात लवकरात - लवकर एम. आय. डी. सी. मंजूर होणे गरजेचे असल्याचे पत्र आमदार समाधान आवताडे यांनी राज्याचे उद्योग मंत्री ना. उदय सामंत यांना दिले आहे.
सदर पत्रामध्ये आ. आवताडे यांनी म्हटले आहे की, पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिर हे भारताची दक्षिण काशी म्हणून संपूर्ण देशभर प्रसिद्ध आहे. लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान व उभ्या महाराष्ट्राचे श्री विठ्ठल आराध्य दैवत आहे. श्री विठ्ठल भगवंतावर असणाऱ्या श्रद्धेपोटी दरवर्षी लाभो वारकरी भाविक हे चैत्री, आषाढी, कार्तिकी, माघी या यात्रेसाठी वारी रूपामध्ये पंढरपूर शहरामध्ये दाखल होतात. पंढरपूरची ही वारी फक्त महाराष्ट्र राज्यापर्यंत मर्यादित न राहता या वैष्णव सोहळ्यासाठी कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश आदी राज्यातून एक कोटीपेक्षा अधिक वारकरी भाविक जमा होतात. श्री. क्षेत्र पंढरपूर शेजारी कासेगाव, लक्ष्मी टाकळी, वाखरी, गोपाळपूर, ही निमशहरी म्हणून गावे वसलेली आहेत. पंढरपूर शहर व ४ निमशहरी गावांची लोकसंख्या २ लाख आहे. एवढे मोठे प्रादेशिक आणि लोकसंख्या क्षेत्र असणाऱ्या गावातील अनेक युवक हे रोजगारानिमित्त राज्यातील व परराज्यातील शहराकडे विस्थापित होत आहेत. महाराष्ट्र राज्यातून प्रत्येक तालुक्यातून, जिल्ह्यातून एस. टी., रेल्वे, खाजगी वाहनाने अनेक लोक पंढरपूर येथे येत असतात. तसेच पंढरपूर शहराला जोडणारे पालखी मार्ग, राज्य मार्ग, राष्ट्रीय महामार्ग झालेले आहेत.
शिक्षण व उच्च शिक्षणाच्या दृष्टीने पंढरपूर शहर हे नावारूपास आलेले अग्रगण्य शहर आहे. सद्य काळामध्ये पंढरपूर तालुक्यात ४ अभियांत्रिकी कॉलेज, विविध पदवी महाविद्यालय, अनेक विद्यालये आहेत. या ज्ञान संकुलामध्ये शिक्षण घेऊन अनेक विद्यार्थी दरवर्षी निरनिराळ्या पदव्या संपादन करत आहेत. कीर्तिमान गुणवत्ता आणि आवश्यक पात्रता असूनसुद्धा केवळ अपुऱ्या रोजगार संधी असल्यामुळे हे अनेक विद्यार्थी बाहेर पडून आपल्या नोकरीची संधी शोधत आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम येथील समाजजीवनावर आणि अर्थकारण यावर होताना दिसून येत आहे. तालुक्यातील अर्थचक्र गतिमान करण्यासाठी एम. आय. डी. सी. स्थापन व्हावी यासाठी आ. आवताडे हे अगदी सुरुवातीपासूनच आग्रही आणि प्रयत्नशील आहेत. यापूर्वी म्हणजेच ९ नोव्हेंबर २०२१ रोजी सदर मागणी करणारे पत्र आ.आवताडे यांनी तत्कालीन उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनाही दिले होते. सध्याच्या काळामध्ये वाढत जाणारी बेरोजगारी आणि शासकीय नोकऱ्यांचे असणारे दुर्मिळ प्रमाण याच्यामधून सुवर्णमध्य काढण्यासाठी ही एम. आय. डी. सी. स्थापन होणे अतिशय गरजेचे असल्याचे मत आ. आवताडे यांनी उद्योग मंत्री ना. उदय सामंत यांच्याकडे मांडले आहे.
पंढरपूर तालुक्याचा एकुणात्मक आपल्या संपूर्ण मतदारसंघाच्या धोरणात्मक विकासासाठी नेहमीच आपल्या नेतृत्व कौशल्याचा आणि विधायक कार्याचा अट्टहास करणारे आ. आवताडे यांच्या अथक प्रयत्नांतून आणि नव्याने स्थापन झालेल्या शिंदे - फडणवीस सरकारच्या सहकार्यातून ही एम. आय. डी. सी. साकार होण्याच्या जनतेच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत.