*ओंकार गायकवाड याची राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी निवड*
पंढरपूर/ प्रतिनिधी
उपरी येथील विद्यार्थी, मल्ल ओंकार विश्वनाथ गायकवाड याने सोलापूर जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धेत १५ वर्षे वयोगटातून विजेतेपद पटकविले. त्यामुळे त्याची आता पुढील 'राज्यस्तरीय अजिंक्यपद' कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ संलग्नित सोलापूर जिल्हा कुस्तीगीर संघाच्यावतीने कुर्डूवाडी येथे दि. २९ व ३० डिसेंबर रोजी 'राज्यस्तरीय अजिंक्यपद' कुस्ती स्पर्धेसाठी मुले व मुलींच्या निवड चाचणी स्पर्धा घेण्यात आल्या. १५, १७ व २० वय आणि विविध वजन गटात या स्पर्धा पार पडल्या. संपूर्ण जिल्ह्यातील अनेक मल्लांनी स्पर्धेत घेतला. यामधील १५ वर्षे वय आणि ८५ किलो वजन गटातून ओंकार विश्वनाथ गायकवाड याने सहभाग घेतला होता. या स्पर्धेत त्याने प्रथम क्रमांक पटकविल्याने त्याची आगामी 'राज्यस्तरीय अजिंक्यपद' कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाल्याची घोषणा कुस्तीगीर संघाने केली.
दरम्यान, ८५ किलो वजन गटात विजेता ठरलेल्या ओंकार गायकवाड याचाच जुळा भाऊ श्रीकृष्ण विश्वनाथ गायकवाड यानेही ७२ किलो वजन गटाच्या निवड चाचणी स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्याला या स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळाला. जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष 'कुस्तीसम्राट' अस्लम काझी, सचिव योगेश बोंबाळे, वस्ताद नामदेव बोडरे यांनी दोघांचाही गौरव करीत पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
उपरी येथील शेतकरी विश्वनाथ लक्ष्मण गायकवाड यांची ओंकार गायकवाड आणि श्रीकृष्ण गायकवाड ही जुळी मुले आहेत. दोघेही आटपाडी येथे शिक्षण घेत तेथील वीर हनुमान प्रशिक्षण केंद्गात वस्ताद नामदेव बोडरे यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचे प्रशिक्षण घेत आहेत. या दोघांनीही आजवर सोलापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांमधील अनेक कुस्ती मैदानांमध्ये विजयी होऊन पारितोषिके पटकविली आहेत. 'महाराष्ट्र केसरी' होण्याचे ध्येय ठेऊन दोघांचाही जिद्दीने अगदी लहानपणापासून आखाड्यात राहून सराव सुरू असल्याची माहिती त्यांचे वडील विश्वनाथ गायकवाड यांनी दिली.