*कोल्ड स्टोरेज फुल्ल..,बेदाण्याचे भाव गडगडले.* *द्राक्ष उत्पादक हवालदिल,आर्थिक संकटाचे ढग.* *अन्यथा...रयत क्रांती संघटना कृषी उत्पन्न बाजार समिती समोर तीव्र आंदोलन करणार ....!*
करकंब:/प्रतिनीधी
-गेल्या काही वर्षापासून बाजारात द्राक्षाला भाव नसल्याने शेतकरी बेदाण्याकडे वळले आहेत.परिणामी बेदाण्यालाही मागील वर्षीच्या तुलनेत खूपच भाव कमी असल्याने सोलापूर, सांगली, तासगाव, पंढरपुर करकंब येथील स्टोअरेज फुल्ल भरले आहेत.त्यामुळे द्राक्ष उत्पादकांवर आर्थिक संकटाचे काळे ढग पसरू लागले असून शेतकरी हवालदिल झाले आहेत.
बेदाण्याची आवक जास्त आणि मागणी कमी असल्याने
सौदा झाल्यानंतर व्यापारी माल उचलायला तयार नाहीत. तर अपवाद वगळता कमी दरात शेतकरी माल देत नाहीत. त्यामुळे बेदाणा स्टोरेजमध्ये पडून आहे.
पंढरपूर बाजार समितीत मंगळवार आणि शनिवार बेदाणा लिलाव सुरू आहेत. सुरुवातीला सरासरी १७० ते १८० रुपयांचा दर मिळत होता. त्यामुळे ९० टक्के शेतकरी माल सोडत होते. त्यानंतर द्राक्षांचा दर ४० रुपयांवर आला.
आता 15 ते 20 रुपयांवर आल्याने द्राक्ष विकणारे शेतकरी बेदाण्याकडे वळले आहेत. बेदाण्याची आवक वाढल्याने आज पर्यंत १२० ते १४० रुपयापर्यंत भाव मिळत होता. सध्या 90 ते 100 रुपयांपर्यंत दर आहे. त्यामुळे शेतकरी माल सोडायला तयार नाहीत.
त्यामुळे बेदाणा स्टोरेजमध्ये आता जागा नाही. अडत दुकानात विक्रीसाठी आलेल्या बॉक्समधील 30 ते 40 टक्के बॉक्सची विक्री होत आहे. तेही व्यापारी उचलायला तयार नाहीत. कारण, त्यांनाही कुठे जागा नाही. सध्या बेदाणा मार्केट पडल्यामुळे शेतकरी माल विकणार नाहीत. दर वाढत नाही, तोपर्यंत माल पडूनच राहणार आहे. शेतकऱ्यांना कोणच वाली नसल्याने सोलापूर जिल्हा रयत क्रांती संघटनेने याबाबत आक्रमक पाऊल उचलून बेदाणा दराबाबतीत रयत क्रांती संघटना सोलापूर जिल्हा च्या वतीने पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती समोर लवकरच तीव्र आंदोलन करणार असल्याचे रयत क्रांती संघटनेचे सोलापूर जिल्हा युवा अध्यक्ष -नंदकुमार व्यवहारे यांनी सांगितले.
यंदा हंगाम सुरु झाल्यावर २०० रुपयांपर्यंत दर मिळत होता. त्यामुळे सुरुवातीला लिलावात ९० टक्के बेदाणा विकला गेला जात होता आता दर पडल्याने 70 टक्के माल सोडला जात नाही म्हणजे शेतकरी माल देण्यास तयार नाहीत. त्यामुळे स्टोरेजमधील माल बाहेर जात नाही आणि स्टोरेज मध्ये नव्याने आलेला बेदाणा ठेवण्यास जागा नाही त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना बेदाणा घरीच ठेवावा लागत आहे.
*शासनाने निर्यातीचे पक्के धोरण ठरविण्याची गरज.*
कमी पाण्यात जास्त उत्पादन देणारे पीक म्हणून द्राक्ष शेतीकडे पाहिले जात होते .त्यामुळे करकंब व परिसरात द्राक्ष पिकाची मोठ्या प्रमाणात बागा लावल्या गेल्या परंतु सतत बदलते वातावरण आणि त्यामुळे होत असलेला न परवडणारा खर्च आणि त्यातूनच कमी भावामुळे विकला जात नसलेला बेदाणा यामुळे कृषी प्रधान समजल्या जाणाऱ्या देशात द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक वाताहत होऊ लागली आहे. द्राक्ष शेती उभारण्यासाठी द्राक्ष झाडापासून ते फाउंडेशन ठिबक रासायनिक खते खत हे द्राक्ष फळ येईपर्यंत एकरी सुमारे चार लाख रुपये खर्च येतो त्यातूनही या द्राक्ष फळाची बाजारात विक्री करायची असेल तर व्यापारी 20 ते 25 रुपयाच्या दराने घेऊन हीच द्राक्ष व्यापारी 50 ते 60 विक्री करतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी बेदाणे निर्मितीकडे लक्ष केंद्रित करून बेदाणा निर्मिती केली. परंतु बेदानाला बाहेर मार्केट असूनही व्यापाऱ्यांच्या संगनमतामुळे शेतकऱ्यांचा बेदाणा आजही कोल्ड स्टोरेज मध्ये पडून आहे त्यामुळे द्राक्ष उत्पादक असलेला हा शेतकरी मोठ्या आर्थिकअडचणीत सापडल्याने याचा फायदा व्यापारी घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे..शासन स्तरावरून कच्ची द्राक्ष आणि बेदाणा निर्यातीचे पक्के धोरण न ठरविल्यास शेतकऱ्यांना द्राक्ष शेतीला कुऱ्हाड लावण्याशिवाय पर्याय नाही.
सध्या बेदाणा निर्मितीसाठी खर्च प्रति किलो 30 ते 40 रुपये येत असून मजुरी त्यातच रासायनिक खतांची 30 ते 40 टक्के झालेली वाढ बदलत्या निसर्गाच्या हवामानामुळे वारंवार करण्यात येणारे फवारणी यामुळे शेतकरी मेटाकोटीला आला आहे. काळा चॉकलेट बेदाणा वीस रुपये ते 60 रुपये पर्यंत तर हिरवा बेदाणा 90 रुपये ते 130 रुपये पर्यंत असा असल्याने द्राक्ष उत्पादक व बेदाणा निर्मिती करणाऱ्या शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ आली आहे.
........................................
द्राक्षाचा उत्पादन खर्च जास्तीचा आहे. शिवाय हवामान खराब असेल तर ती पदरात पडेल याची शक्यता कमी असते आणि अशाच पद्धतीने मिळणारा भाव कमी असल्याने बागा कशा जोपासाव्यात असाव्यात हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे शासन स्तरावरून पक्के धोरण ठरवणे गरजेचे आहे.
श्री. विष्णू शेटे
द्राक्ष उत्पादक शेतकरी
करकंब.
...........................….........
*चौकट*
. *बेदाणा लिलावामध्ये हिरवा बेदाणा दीडशे रुपये पासून सुरुवात करावी. तसेच बेदाणा उत्पादकांना भांडवली खर्चाचा विचार करून शासनाने बेदाणाचा शालेय पोषण आहारात समावेश करावा.*
*श्री .नंदकुमार व्यवहारे.*
*जिल्हा युवा अध्यक्ष. रयत क्रांती संघटना; सोलापूर.*