*लक्ष्मी टाकळीसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना* *नवीन वर्षात शिंदे सरकारची

पंढरपूर /प्रतिनिधी
पंढरपूरलगत असणाऱ्या टाकळी गावासाठी साडेनऊ कोटी रुपये खर्चून, स्वतंत्र पाणीपुरवठा योजना होत आहे. यासाठीची निविदाही जाहीर करण्यात आली आहे. नववर्षात टाकळी ग्रामपंचायतीला राज्यातील शिंदे फडणवीस सरकारची ही मोठी भेट असल्याची चर्चा, पंढरपूर तालुक्यातून होत आहे. याकामी बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे संपर्कप्रमुख महेश साठे यांचे आभार येथील ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.
तीर्थक्षेत्र पंढरपूर नगरीच्या लगत असणाऱ्या टाकळी गावात काही दिवसांपूर्वी विस्मयकारक बदल झाला आहे. येथील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये विकासप्रिय साठे बंधूंचा शिरकाव झाला. परिचारक गटाच्या सहकार्याने संजय साठे यांची उपसरपंचपदी निवड झाली. येथूनच या ग्रामपंचायतीचे दिवस पालटू लागले. काही दिवसांपूर्वीच टाकळी ते पंढरपूर शहराला जोडणाऱ्या रोडसाठी २० कोटी रुपयांचा निधी मिळाला होता. आता टाकळीसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना मंजूर झाली. यासाठीची साडेनऊ कोटी रुपयांची निविदाही जाहीर करण्यात आली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत ही पाणीपुरवठा योजना पुढील आठ महिन्यात कार्यान्वित होणार असून, टाकळी ग्रामपंचायत काही दिवसातच नगरपंचायत होईल यात कोणतीही शंका बाळगण्याचे कारण नाही.
टाकळी गावासाठी यापूर्वी २.६५ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली होती. या योजनेतून टाकळी ग्रामस्थांची तहान भागणार नव्हती. याच योजनेत नव्याने चार एमएलडी क्षमतेच्या शुद्धीकरण केंद्राचा समावेश करण्यात आला. पाणी साठवण्यासाठी टाकीचाही अंतर्भाव करून, २२.३८ कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली. हे काम साहजिकच संपर्कप्रमुख महेश साठे यांनी पार पाडले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी महेश साठे यांची असलेली जवळीक यासाठी कारणीभूत ठरली. ही योजना टाकळी गावात राबवण्यात येणार असल्याने, टाकळी ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
याकामी सरपंच विजयमाला वाळके, उपसरपंच संजय साठे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी शिंदे फडणवीस सरकारचे आभार मानले आहे. याशिवाय राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक आणि शिवसेनेचे संपर्कप्रमुख महेश साठे यांचेही शतशः आभार मानले आहे.
चौकट
*साठे बंधूंचा करिष्मा*
बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख महेश साठे यांचे कुटुंब मुळातच विकासप्रिय आहे. ग्रामपंचायत प्रशासनात त्यांचा शिरकाव झाला, आणि टाकळी ग्रामपंचायतीचे दिवसच पालटले आहेत. टाकळी नगरपंचायत करण्यापासून कोट्यावधी रुपयांचा निधी, ओढून आणण्यात साठे बंधू यशस्वी होत आहेत. याचा फायदा साहजिकच टाकळी ग्रामपंचायतीला होत आहे.