*खंडित वीज पुरवठा तात्काळ सुरू करा* *वीज बिल भरण्यास मुदतवाढ द्या* *पंढरपूर काँग्रेसची महावितरणकडे मागणी*

पंढरपूर /प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विद्युत पंपांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. अचानक खंडित करण्यात आलेला हा वीजपुरवठा तात्काळ सुरू करावा, आणि वीज बिल भरण्यासाठी शेतकऱ्यांना फेब्रुवारी २०२२ पर्यंतची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस हनुमंत मोरे यांनी महावितरण कंपनीकडे केली आहे.
यासंदर्भातील निवेदन शुक्रवारी महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता गवळी यांना देण्यात आले आहे. यावेळी शेतकऱ्यांच्या वीजपुरवठया संदर्भातील समस्यांवर चर्चा करण्यात आली . यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस हनुमंत मोरे, ओबीसी जिल्हा विभागाचे माजी अध्यक्ष समीर कोळी, इरकल साहेब , तसेच सुहास भाळवणकर , नागेश अधटराव आणि बाळासाहेब आसबे इत्यादी काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.
पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांकडे वीज बिलाची थकबाकी असल्याने, त्यांच्या विद्युत पंपांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. अचानक खंडित करण्यात आलेल्या वीज पुरवठ्यामुळे या शेतकऱ्यांची पिके करपू लागली आहेत. याशिवाय सध्या रब्बी पेरणीचा हंगाम सुरू आहे. खंडित वीज पुरवठ्यामुळे तोही लांबणीवर पडू लागला आहे. याचा फटका शेतकऱ्यांना भविष्यात बसणार आहे. मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार आहे. अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित केल्यामुळे, पिण्याच्या पाण्याची तारांबळ उडाली आहे.
सध्या साखर कारखाने १५ दिवसांपूर्वीच सुरू झाले आहेत. सध्याचा हंगाम ऊस तोडणीचा आहे. येत्या पंधरा ते वीस दिवसापासून शेतकऱ्यांना ऊस बिलाची रक्कम हाती पडणार आहे. याशिवाय शेतकऱ्यांकडे वीज बिलाची असलेली थकबाकी मोठी असल्याने, टप्प्याटप्प्याने वीजबिले आकारणे महत्त्वाचे आहे. याकरिता खंडित केलेला वीजपुरवठा तात्काळ सुरू करावा, आणि विज बिल भरण्यासाठी शेतकऱ्यांना फेब्रुवारी २०२२ अखेर पर्यंतची मुदतवाढ देण्यात यावी , अशी मागणी पंढरपूर काँग्रेसकडून करण्यात आली आहे.
चौकट
पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांकडे महावितरण कंपनीची थकबाकी मोठी आहे . सहाजिकच महावितरणने अनेक शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित केला आहे. हा वीज पुरवठा तात्काळ सुरू करावा, विज बिल भरण्यासाठी शेतकऱ्यांना फेब्रुवारी २०२२ अखेर पर्यंतची मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी पंढरपूर तालुक्यातील काँग्रेस नेते मंडळींनी केली आहे.