*तहानलेल्या पक्ष्यांना पाण्याची सोय करा: प्राचार्य डॉ. दादासाहेब साळुंखे*

पंढरपूर /प्रतिनिधी
: "उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने निसर्गामध्ये मनसोक्त फिरत असणाऱ्या पक्ष्यांसाठी सर्वांनी पिण्याच्या पाण्याची सोय केली पाहिजे. रखरखत्या उन्हापासून पक्ष्यांचे संरक्षण करण्यासाठी कृत्रिम घरटी बनवून घरातील अंगणामध्ये व परसबागेमध्ये असलेल्या झाडावर ठेवली पाहिजेत." असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दादासाहेब साळुंखे यांनी व्यक्त केले.
रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बनविलेल्या पक्ष्यांसाठीची कृत्रिम घरटी व पाणी पिण्याचे पात्र याचे प्रदर्शन महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभाग व कर्मवीर निसर्ग मंडळाच्या वतीने आयोजित केले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दादासाहेब साळुंखे यांचे हस्ते संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शास्त्र शाखेच्या उपप्राचार्य प्रोफे. डॉ. लतिका बागल, ग्रंथपाल डॉ. विनया पाटील, प्रा. डॉ. दत्ता डांगे आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी टाकावू वस्तूंचा वापर करून कृत्रिम घरटी व पाणी पिण्याचे पात्र यांची निर्मिती केली होती. यामध्ये प्लास्टिकच्या रिकाम्या बॉटल, बरण्या, नारळाच्या करवंट्या याचा विशेष वापर केला गेला. या वस्तूंची पाहणी करताना सर्व नागरिकांनी देखील आपआपल्या घरी पक्ष्यांसाठी कृत्रिम घरटी व पाणी पिण्याचे पात्र ठेवावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
विविध आकारांमध्ये बनविलेल्या कृत्रिम घरटी व पाणी पिण्याचे पात्र या सर्व गोष्टी महाविद्यालयाच्या परिसरातील झाडांवर ठेऊन त्याची निगा राखण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांवर देण्यात आली. या कार्यक्रमास प्राणीशास्त्र विभागातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
या प्रदर्शनाचे प्रास्ताविक प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. अमर कांबळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. समृद्धी सावंजी हिने केले; तर आभार प्रा. हर्षदा चव्हाण यांनी मांडले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. डॉ. अमोल ममलय्या, प्रा. प्रदीप गायकवाड, प्रा. अक्षय माने, यांनी परिश्रम घेतले.
....