*भगीरथ भालके यांचा बी.आर.एस. मध्ये प्रवेश निश्चित* *विठ्ठल परिवारात पुन्हा नव्याने प्रश्न*
पंढरपूर /प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके यांचा बी.आर. एस. पक्षात प्रवेश निश्चित झाला असून, उद्या मंगळवारी ते राष्ट्रवादीला रामराम करून, या पक्षात प्रवेश करतील असे राजकीय वातावरण निर्माण झाले आहे. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला हा मोठा धक्का मानला जात आहे.
राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके यांनी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा निवडणुकीत एक लाखाहून अधिक मते घेतली होती. यानंतरच्या काळात राष्ट्रवादीने त्यांना दूर लोटल्याची भावना त्यांच्या मनात झाली. मागील अनेक दिवसापासून ते तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव
यांच्या संपर्कात होते. सहकार शिरोमणी कारखान्याच्या निवडणुकीवेळीच त्यांना बी. आर. एस. पक्षाने हैदराबादला येण्यासाठी विमान पाठवले होते. त्यांनी सहकुटुंब तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची हैदराबादमध्ये भेट घेतली होती. यावेळेसपासून ते बी.आर. एस. पक्षात जाणार अशी शक्यता वर्तवण्यात येत होती.
मागील दोन दिवसात भगीरथ भालके यांनी मंगळवेढा तालुक्यातील समर्थकांची बैठक घेतली. रविवारी पंढरपूर येथील समर्थकांच्या बैठकीत समर्थकांनी त्यांना कोणत्याही पक्षात जा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असे ठामपणे सांगितले. काही समर्थकांनी राष्ट्रवादीसह इतर पक्षांची राजकीय पदेही याच दिवसापासून सोडण्याचा निर्धार केला. .पंढरपूरमधील ही बैठक मोठी वादळी ठरली.
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे मंगळवारी पंढरपूरमध्ये येत आहेत. त्यांचे मंत्रिमंडळही त्यांच्या सोबत असणार आहे. याच दिवशी भगीरथ भालके यांनी सरकोली येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्यातच ते के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकून, बी आर.एस.पक्षात प्रवेश करतील, अशी शंभर टक्के खात्री वर्तवली जात आहे.
चौकट
भालके सोबत जाणार कोणते पदाधिकारी?
पंढरपूरमधील राष्ट्रवादी नेते भगीरथ भालके हे राष्ट्रवादी काँग्रेसला राम राम ठोकून बी.आर.एस. पक्षात प्रवेश करण्याचे निश्चित झाले आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे मंगळवारी पंढरपूरमध्ये येत आहेत. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत सरकोली येथे भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात भालके समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
याच मेळाव्यात भगीरथ भालके यांचा बी.आर. एस. पक्षात प्रवेश होणार असल्याचे पक्के राजकीय गणित मांडले जात आहे. मात्र पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील कोण कोण अधिकृत पदाधिकारी भालके सोबत जाणार याबाबतही चर्चा रंगू लागली आहे.