आषाढी काळात पंढरीत संचारबंदी! मंदिर बंद ... स्नानासाठीही बंदीच

पंढरपूर (प्रतिनिधी)
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने, यंदाचा आषाढी सोहळा प्रतीकात्मक करण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. तोंडावर येऊन ठेपलेल्या या आषाढी सोहळ्यासंदर्भात जिल्हाधिकार्यांनी नुकतेच प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. यामध्ये देण्यात आलेल्या सूचनांप्रमाणे, आषाढी काळात पंढरपूरमध्ये संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मंदिर दर्शनासाठी बंद राहणार आहे. याचवेळी चंद्रभागेच्या पात्रात स्नान करण्यासाठी मज्जाव करण्यात आला आहे.खाजगी वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. यामुळे यंदाच्या आषाढी सोहळ्यातही भाविकांच्या आनंदावर विरजण पडले आहे.
श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा आषाढी सोहळा, येत्या २० जुलै रोजी प्रतीकात्मक स्वरूपात संपन्न होत आहे. दि.११ जुलै ते २४ जुलै दरम्यानचा काळ आषाढी यात्रा काळ आहे. या अनुषंगाने या आषाढी सोहळ्याची तयारी, शासनाकडून करण्यात येत आहे. यंदाचा आषाढी सोहळा खुल्या वातावरणात पार पडण्यासाठी, अनेक वारकरी संघटनांनी जोर लावला होता , परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा आषाढी सोहळा रद्द करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे. आषाढी सोहळ्यातील सर्व धार्मिक रीतिरिवाज आणि परंपरा यांचे पालन करण्यासाठी, हा सोहळा प्रतीकात्मक स्वरूपात करण्याचे धोरण अवलंबण्यात आले आहे.
दरवर्षीच्या आषाढी यात्राकाळात पंढरीत होणारी गर्दी पाहता , शासनाकडून प्रतिबंधात्मक उपाय योजण्यात आले आहेत. दि. १७ जुलै ते २५ जुलै दरम्यान, पंढरपूर शहरासह लगतच्या ९ गावांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात पंढरपूर शहरातून सुटणाऱ्या बसेस आणि अत्यावश्यक सेवा वगळता, इतर खाजगी वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. एवढ्यावरच न थांबता, चंद्रभागेच्या पात्रात स्नान करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. या सर्व बाबींची अंमलबजावणी करण्यासाठी, कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
श्री संत एकनाथ महाराज, श्री संत निवृत्तीनाथ महाराज, श्री चांगाटेश्वर देवस्थान, संत सोपानदेव महाराज, श्री संत मुक्ताबाई, विठ्ठल रखुमाई, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज, आणि संत निळोबाराय या संस्थानांहून निघणाऱ्या मानाच्या १० पालख्या , बसेसमधून पंढरपूर येथे आणण्यास परवानगी देण्यात आली आहे. या पालख्या आषाढ शुद्ध दशमी दिवशी म्हणजेच १९ जुलै रोजी वाखरी येथे पोहोचणार आहेत. या ठिकाणाहून पायी पालखी सोहळा, श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या मंदिरा कडे नेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. फक्त २० भाविकांच्या उपस्थितीत, हा पालखी सोहळा शहराकडे मार्गक्रमण करणार आहे.
चौकट
*मंगळवार दि. २० जुलै रोजी श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचा आषाढी एकादशी सोहळा*
*एकादशी दिवशी पहाटे २.२० ते २.३० दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मानाच्या वारकऱ्यांच्या हस्ते श्री विठ्ठलाची महापूजा*
*आषाढी काळात दि.१७ ते २५ जुलै पर्यंत, पंढरपूर शहर आणि लगतच्या ९ गावांमध्ये संचारबंदी*
*या काळात दर्शनासाठी मंदिर बंदच राहणार नदीपात्रात स्नानास बंदी*
*मानाच्या १० पालख्यांचे बसमधून १९ जुलै रोजी, वाखरी येथे आगमन, २४ जुलै रोजी पालख्या माघारी फिरणार*