*“श्रमाशिवाय मानवी जीवनाला अर्थ प्राप्त होत नाही” – प्राचार्य डॉ. आर. डी. गायकवाड*

*“श्रमाशिवाय मानवी जीवनाला अर्थ प्राप्त होत नाही” – प्राचार्य डॉ. आर. डी. गायकवाड*


पंढरपूर/प्रतिनिध

“श्रम ही खरी पूजा असून श्रमाशिवाय मानवी जीवनाला अर्थ प्राप्त होत नाही. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी श्रमाचे मोल जाणले होते. शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी व कामगार यांच्या जीवनात प्रकाश निर्माण करण्यासाठी शिक्षण अत्यावश्यक होते. गरीबाला शिक्षणाचे दरवाजे खुले करण्यासाठी श्रमाशिवाय पर्याय नव्हता. म्हणून त्यांनी ‘कमवा व शिका’ या योजनेची निर्मिती केली. शिक्षणाने माणूस ज्ञानी तर झालाच पाहिजे परंतु त्याला कामाची लाज वाटू नये. म्हणून श्रमसंस्कृती राबविण्यासाठी केलेला प्रयत्न हा सार्थकी लागला.” असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव तथा व्यवस्थापन समितीचे सदस्य डॉ. आर. डी. गायकवाड यांनी केले. 
 रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालय व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत  ‘विशेष श्रमसंस्कार शिबीर मौजे भाळवणी येथे संपन्न झाले. या सांगता समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दादासाहेब साळुंखे हे होते. 
 प्राचार्य डॉ. आर. डी. गायकवाड पुढे म्हणाले की, “महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी कष्टकरी, कामगार, व शेतकरी यांना सोबत घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले. मराठी संतांनी श्रम संस्कृतीचा पुरस्कार केला आहे. श्रमातून नव्या वस्तू व वास्तू तयार होत असतात. बौद्धिक श्रमासोबतच शारीरिक श्रमदेखील महत्त्वाचे असतात. अशा प्रकारच्या विशेष श्रमसंस्कारातून विद्यार्थ्यांचे व्यक्तीमत्त्व घडत असते. ज्ञान, विज्ञान, जिद्द, चिकाटी, प्रामाणिकपणा, स्नेहभाव, बंधुभाव, सामाजिक आपुलकी याबाबी निर्माण होत असतात.”
 अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. दादासाहेब साळुंखे म्हणाले की, “रयत शिक्षण संस्थेने सुरु केलेली कमवा व शिका ही योजना आता महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांनी स्वीकारली आहे. शिक्षण प्रणालीमध्ये ‘कमवा आणि शिका’ हे धोरण कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुरु केले. आपल्यातील सुप्त कौशल्ये ओळखून विद्यार्थ्यांनी भविष्याचा वेध घेतला पाहिजे. विशेष श्रमसंस्कार शिबिरातून खेड्याशी विद्यार्थ्यांचे ऋणानुबंध निर्माण झाले पाहिजेत.”
 या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रकल्पाधिकारी डॉ. दत्तात्रय काळेल यांनी केले. या प्रास्ताविकता त्यांनी विशेष श्रमसंस्कार शिबिराचा अहवाल सादर केला. शिबिरातील अनुभव गोकुला जमदाडे, धनश्री तांबवे, प्रसाद वेदपाठक, साक्षी पाटील यांनी सांगितले. यावेळी आदर्श स्वयंसेवक म्हणून हेमांगी चव्हाण, अभि ढावरे व सौ. रेश्मा आकळे यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात समाधान काळे, श्रीमती राजश्री ताड, उपप्राचार्य डॉ. लतिका बागल यांनी मनोगते व्यक्त केली. या कार्यक्रमास पंचायत समिती व विठ्ठल रुक्मिणी मंदीर समिती सदस्य संभाजी शिंदे, संजय हाके पाटील, शिवाजीराव देशमुख, रयत सेवक संघ सचिव अनिल खरात, सरपंच विठ्ठल चौगुले, संजय बाबर, नितीन शिंदे, शशिकांत विभूते, राजाराम कदम, मुख्याध्यापक गायकवाड, डॉ. सुशील शिंदे, उपप्राचार्य  प्रोफे. डॉ. बजरंग शितोळे, प्रोफे. डॉ. फैमिदा बिजापुरे, उपप्राचार्य प्रोफे. डॉ. तानाजी लोखंडे, प्रोफे. डॉ. चांगदेव कांबळे, डॉ. कदम सर, डॉ. सातपुते , प्रा. नाईकनवरे मँडम तसेच न्यू इंग्लीश स्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्सचे सर्व शिक्षक आदी मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. डॉ. दत्तात्रय काळेल, डॉ. दत्तात्रय चौधरी, प्रा. डॉ. नवनाथ पिसे, प्रा. डॉ. अमोल ममलय्या, डॉ. भारत सुळे, डॉ. अनिस खतीब, प्रा. अमोल मोरे, प्रा. रावसाहेब मोरे, यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिमानी चव्हाण यांनी केले. शेवटी उपस्थितांचे आभार डॉ. नवनाथ पिसे यांनी मानले.     
...................................................................................................................................................................................................