*शाळा, रस्ते व आरोग्य सुविधांवर अधिक काम करणार* महिला सक्षमीकरण व युवकांना रोजगार मिळवून देणे महत्वाचे *पंढरपूर श्रमिक पत्रकार संघाच्या वार्ताला कार्यक्रमात वाखरी जिल्हा परिषद सदस्य मयुरीताई बागल यांनी दिली माहिती*
पंढरपूर/ प्रतिनिधी
वाखरी जिल्हा परिषद गटात येणाऱ्या गावांमधील जिल्हा परिषद शाळा अधिक दर्जेदार व सर्व सुविधा नियुक्त बनवणे, विविध गावातील रस्ते, आरोग्य केंद्राच्या ठिकाणी विविध प्रकारची औषधे, वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात यावर या पुढच्या काळात अधिक काम करणार असल्याचे जिल्हा परिषद वाखरी गटाच्या सदस्या मयुरी संतोष बागल यांनी सांगितले.
पंढरपूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने चिंचणी येथे आयोजित वार्तालाप कार्यक्रमात त्यांनी विविध विषयांवर सविस्तर माहिती देत आपले व्हिजन सांगितले. यावेळी जगदंबा उद्योग समूहाचे संचालक संतोष बागल उपस्थित होते. सर्वसामान्यांच्या मुलांसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अधिक चांगल्या दर्जाच्या व्हाव्यात यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणार आहे. आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बागल वस्ती, वाखरी ही शाळा जिल्हात क्रमांक एक ची शाळा बनली आहे. त्याप्रमाणे सर्व शाळा बनाव्यात असा प्रयत्न आहे. वाखरी जिल्हा परिषद गटात येणाऱ्या १२ शाळांना अद्याप संरक्षण भिंत नाही, पंधरा शाळांच्या ठिकाणी विविध प्रकारची दुरुस्तीची कामे करणे आवश्यक आहे, त्यासाठीचा पाठपुरावा सुरू आहे.
आज इंडियन ऑइल कंपनीकडून सीआरएस फंडातून पटवर्धन कुरोली येथे ७५ लाख रुपयांची विविध कामे होणार आहेत. त्यामध्ये युपीएससी तयारी करणाऱ्या मुलांसाठीचे अभ्यासिका उभारण्यात येत आहे. शिवाय विविध शाळांची रंगरंगोटी करण्यात येत आहे.
अव्हे तरडगाव ग्रुप ग्रामपंचायत मधील तरडगाव या ठिकाणी आजही भगीरथ योजनेची लाईट नाही, स्मशानभूमीच्या प्रश्न आहे. तो लवकरात लवकर सोडवला जावा यासाठीचा प्रयत्न सुरू आहे. वाखरी जिल्हा परिषद गटातील एकही गावात प्राथमिक आरोग्य केंद्र नाही. पटवर्धन कुरोली येथे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू व्हावे यासाठी पाठपुरावा सुरू आहे. महिला सक्षमीकरणासाठी ज्या ज्या काही योजना आहेत, त्या वाखरी गटातील महिलांना मिळाव्यात यासाठी काम करणार आहे. सुशिक्षित बेरोजगार युवकांना काम मिळावे, उद्योगधंद्यासाठी मदत मिळावी यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्याचे नियोजन आहे. महिला बचत गटाच्या माध्यमातून महिला रोजगार मेळावे घेत महिलांच्या हाताला काम मिळावे यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे बागल यांनी सांगितले.
माढा विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार अभिजीत पाटील, विठ्ठलचे माजी चेअरमन भगीरथ भालके तसेच विठ्ठल परिवारातील सर्व घटकांनी साथ दिली. शेतकरी चळवळीत काम करीत असताना विविध गावांमध्ये माणसे जोडली गेली. विष्णूभाऊ बागल यांनी आपल्या पं.स. उपसभापती पदाच्या कार्यकाळात वाखरी गणात केलेली विविध कामे, सासरे विठ्ठलचे माजी संचालक सूर्यकांत बागल यांचा जनसंपर्क, शिवाय दिर तानाजी बागल यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून केलेली आंदोलने, कामे याचाही फायदा या निवडणुकीत झाल्याचे बागल यांनी सांगितले.
चौकट:
वाखरी जिल्हा परिषद गटात येणाऱ्या बाजीराव विहिरीचे सुशोभीकरण करण्याचा प्रयत्न आहे. वारकरी या ठिकाणी थांबतील, त्यांना वारकरी संप्रदाय याविषयी तसेच इतर मिळावी यासाठीचे काम करणार असल्याचे बागल यांनी सांगितले.
चौकट :
वाखरी जिल्हा परिषद गटात काम करीत असताना आमची तिसरी पिढी आज राजकारण, समाजकारणात आहे. आमची सर्वसामान्य नागरिकांची जोडली गेलेली नाळ कायम आहे. आज उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आवाज उठवत आलेलो आहोत. या पुढील काळात देखील गटात अधिक जोमाने काम करून एक आदर्श निर्माण करणार असल्याचे उद्योजक संतोष बागल यांनी सांगितले.