*पंढरीत हजारो भाविकांच्या उपस्थितीत महाद्वार काला संपन्न*!
पंढरपूर-/प्रतिनिधी
श्री विठ्ठलाच्या पादुकांवर गुलाल व बुक्क्याची उधळण करीत हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये महाद्वार काला उत्साहात पार पडला. या उत्सवानंतर आषाढी यात्रेची खऱ्या अर्थाने सांगता झाली असल्याचे मानले जाते.
संत नामदेव महाराज व संत पांडुरंग महाराज हरिदास यांच्या वंशजाकडून महाद्वारकाला करण्याची परंपरा आहे. गोपाळपूर चा काला झाल्यानंतर सर्व संतांच्या पालख्या पंढरीचा निरोप घेतात. यानंतर स्थानिकांचा उत्सव अर्थात महाद्वार काला करण्याची गेल्या चारशे वर्षाहून अधिक काळापासून परंपरा आहे. येथील हरिदास घराण्यातील संत पांडुरंग महाराज यांना प्रत्यक्ष श्री विठ्ठलाने दर्शन देऊन आपल्या खडावा अर्थात पादुका प्रसाद रूपाने दिला होत्या. गेल्या 11 पिढ्यापासून हा उत्सव सुरू आहे.

परंपरेनुसार संत नामदेव महाराज यांच्या वंशजाची दिंडी हरिदास यांच्या घरी आल्यानंतर श्री विठ्ठलाच्या पादुका मदन महाराज हरिदास यांच्या मस्तकावर पुजाऱ्यांनी बांधल्या. यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील सभा मंडप येथे पाच प्रदक्षिणा झाल्यानंतर काल्याची दहीहंडी फोडण्यात आली. यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने व्यवस्थापक प्रवीणकुमार घम यांनी पादुकांवर लाह्याची उधळण केली. यानंतर हा उत्सव महाद्वार घाटावरून वाळवंटात घेऊन जातात, परंतु यंदा चंद्रभागेला पूर असल्यामुळे घाटापासूनच तो फिरविण्यात आला. तेथून माहेश्वरी धर्मशाळा, आराध्ये गल्ली, हरिदास वेस येथे परंपरेप्रमाणे दहीहंडी फोडण्यात आली. यावेळी रस्त्यावर हजारो भाविकांनी देवाच्या पादुकांचे दर्शन घेतले तसेच गुलाल, बुक्का व फुलांची उधळण करण्यात येत होती.
श्रीकृष्णाने आपल्या सवंगड्या समवेत काला केल्याचे मानले जाते. यामुळे वारकरी संप्रदायात काल्याला महत्त्व आहे.