*ना. चिंचोली गावच्या महिला सक्षमीकरण मॉडेलची राज्य शासनाकडून दखल*  *ग्रामपंचायतीला राज्यस्तरीय 'आदिशक्ती पुरस्कार' जाहीर *

*ना. चिंचोली गावच्या महिला सक्षमीकरण मॉडेलची राज्य शासनाकडून दखल*   *ग्रामपंचायतीला राज्यस्तरीय 'आदिशक्ती पुरस्कार' जाहीर *

पंढरपूर :- प्रतिनिधी

पंढरपूर तालुक्यातील ग्रामपंचायत नारायण चिंचोलीने महिला सक्षमीकरण, बालकल्याण, लोकसहभाग आणि सर्वांगीण ग्रामविकासाच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत दिला जाणारा प्रतिष्ठेचा 'आदिशक्ती पुरस्कार' जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्कारामध्ये सोलापूर जिल्हास्तरावर तृतीय क्रमांक मिळाल्याने संपूर्ण गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
राज्य शासनाने महिलांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक विकासासाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतींचा गौरव करण्यासाठी हा पुरस्कार जाहीर केला आहे. शासनाच्या निर्णयानुसार महिला सक्षमीकरण, बालकल्याण, शासन योजनांची प्रभावी अंमलबजावणी, ग्रामस्थांचा सहभाग आणि सर्वसमावेशक विकास या निकषांवर ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली. या सर्व निकषांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे नारायण चिंचोली ग्रामपंचायतीची निवड झाली आहे.
ग्रामपंचायतीने गेल्या काही वर्षांत महिलांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देणे, महिला बचत गटांना सक्षम करणे, पोषण अभियान, स्वच्छता अभियान, बालकांच्या आरोग्य व शिक्षणासाठी विविध उपक्रम राबविणे, महिलांचा ग्रामसभेतील सहभाग वाढविणे, सामाजिक जनजागृती, आरोग्य तपासणी शिबिरे आणि स्वावलंबनाकडे वाटचाल घडवून आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. या सर्व उपक्रमांची राज्य शासनाने दखल घेत हा सन्मान जाहीर केला आहे.
या यशामागे सरपंच सौ. नर्मदाताई लक्ष्मण धनवडे यांचे प्रभावी नेतृत्व, ग्रामपंचायत सदस्यांचे सहकार्य, ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग आणि ग्रामप्रशासनाची कार्यक्षम अंमलबजावणी महत्त्वाची ठरली. ग्रामपंचायतीने विकासकामांमध्ये पारदर्शकता, लोकसहभाग आणि नियोजनबद्ध कामकाज यावर भर देत गावाला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न केला.
ग्रामपंचायतीचे मार्गदर्शक माजी आमदार प्रशांत परिचारक तसेच पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संचालक लक्ष्मण (तात्या) धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली गावात रस्ते, स्वच्छता, पिण्याचे पाणी, सार्वजनिक सुविधा, महिला व बालविकास आणि विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. यामुळे नारायण चिंचोलीची ओळख आदर्श आणि प्रगत गाव म्हणून निर्माण झाली आहे.
राज्य शासनाकडून पुरस्कार जाहीर होताच गावात आनंदाचे वातावरण पसरले असून ग्रामस्थांनी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, अधिकारी-कर्मचारी आणि महिला बचत गटांच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. हा पुरस्कार गावाच्या विकासाच्या वाटचालीला नवी ऊर्जा देणारा ठरणार असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
महिला व बालविकास विभागाच्या निकषांनुसार उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये नारायण चिंचोलीने आपले वेगळे स्थान निर्माण केले असून, भविष्यातही महिला सक्षमीकरण, बालकल्याण आणि सर्वांगीण ग्रामविकासासाठी अधिक व्यापक स्वरूपात उपक्रम राबविण्याचा निर्धार ग्रामपंचायतीने व्यक्त केला आहे.


चौकट

 "हा सन्मान संपूर्ण गावाच्या एकजुटीचा"
"आदिशक्ती पुरस्कार हा माझा वैयक्तिक सन्मान नसून संपूर्ण नारायण चिंचोली गावाचा गौरव आहे. ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीवर दाखविलेला विश्वास, सर्व ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच गहिनीनाथ चव्हाण, ग्राम प्रशासन अधिकारी संतोष गायकवाड, अधिकारी-कर्मचारी, महिला बचत गट आणि प्रत्येक ग्रामस्थाच्या सहकार्यामुळेच हा मान मिळाला आहे. भविष्यातही महिला सक्षमीकरण, बालकल्याण आणि गावाच्या सर्वांगीण विकासासाठी अधिक जोमाने कार्य करत राहू."
— सौ. नर्मदाताई लक्ष्मण धनवडे
सरपंच, ग्रामपंचायत नारायण चिंचोली