*पंढरपूर येथील दुष्काळी मोर्चा नसून‘अस्तित्व दाखविण्यासाठी स्टंटबाजी’* *भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा परिषद सभापती चेतनसिंह केदार सावंत यांची टीका*
सांगोला/प्रतिनिधी
दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने पंढरपूर येथे काढण्यात आलेल्या मोर्चावरून सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. हा मोर्चा जनहिताच्या प्रश्नांसाठी नसून पक्षाचे अस्तित्व दाखविण्याच्या उद्देशाने काढण्यात आलेली ‘स्टंटबाजी’ असल्याची टीका मा .जिल्हाध्यक्ष तथा सभापती चेतनसिंह केदार सावंत यांनी केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी केली असून, त्यानंतर राज्यातील इतर भागांचाही दौरा केला. दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन शासनाच्या पातळीवर बैठका आणि विविध उपाययोजनांची प्रक्रिया सुरू असल्याची प्रतिक्रिया चेतनसिंह केदार सावंत दिली.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या कार्यपद्धतीवर विरोधकांकडून करण्यात आलेल्या टीकेलाही यावेळी केदार सावंत यांनी प्रत्युत्तर देण्यात आले. पालकमंत्र्यांनी सोलापूर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीबाबत बैठका घेऊन प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. एखादा आमदार आपल्या विधानसभेसाठी वेळ देत नाहीत तेवढा वेळ पालकमंत्री सोलापूर जिल्ह्यासाठी देतात,त्यामुळे पालकमंत्र्यांच्या कामावर टीका करणाऱ्यांनी आपल्या मतदारसंघात तसेच लोकसभा मतदारसंघात केलेल्या कामाचा लेखाजोखा जनतेसमोर मांडावा, असे आव्हान देण्यात आले.
दुष्काळी उपाययोजनांसंदर्भात शासनाने . जीआर जारी केला असतानाच त्याच दिवशी मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याचा दावा करत, आंदोलनाच्या वेळेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला.
शासनाच्या जीआरमध्ये विविध उपाययोजनांचा समावेश असून, प्रशासनाकडून त्याचा अभ्यास सुरू आहे. आवश्यकतेनुसार संबंधित निकषांचा विचार करून आणखी तालुक्यांचा समावेश होण्याची शक्यता असल्याचेही सांगितले. शासनाचा निर्णय हा सर्वसामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून घेतला जात असल्याचा दावा चेतनसिंह केदार सावंत यांनी केला.
पंढरपूर येथील मोर्चाला अपेक्षित जनसमर्थन मिळाले नसल्याचा दावा करत, दुष्काळासारख्या गंभीर प्रश्नावर काढण्यात आलेल्या आंदोलनाला जनतेचा प्रतिसाद मिळाला नसल्याचे म्हटले.हा मोर्चा नसून अस्तित्व टिकवण्याची धडपड सुरू आहे असे सभापती चेतनसिंह केदार सावंत यांनी म्हणाले.
*चौकट*
आधी कामाचा हिशोब द्या!
“पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे बोट दाखवण्याआधी, स्वतःच्या कामाचा लेखाजोखा जनतेसमोर मांडा!”
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर टीका करणाऱ्यांनी माढा लोकसभा मतदारसंघात लोकप्रतिनिधी म्हणून केलेल्या विकासकामांचा हिशोब जनतेसमोर मांडावा, असे आव्हान सभापती चेतनसिंह केदार सावंत यांनी दिले.
माढा लोकसभा मतदारसंघ आणि सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी जयकुमार गोरे तसेच रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केलेल्या कामांचा लेखाजोखा जनतेसमोर असल्याचा दावा सावंत यांनी केला. “दुसऱ्यांवर टीका करण्यापेक्षा आधी स्वतःच्या कामाचे मूल्यमापन जनतेसमोर मांडा,” असा टोला त्यांनी लगावला.
“उचली जीभ, लावली टाळ्याला” अशी वेळ येऊ नये, असा सूचक इशाराही सावंत यांनी दिला.