*सुनावणी दिवशी सभासद रजिस्टर हजर करा* *सहकार शिरोमणीच्या संचालकांना प्रादेशिक सहसंचालकांची तंबी*

*सुनावणी दिवशी सभासद रजिस्टर हजर करा*  *सहकार शिरोमणीच्या संचालकांना प्रादेशिक सहसंचालकांची तंबी*

पंढरपूर (प्रतिनिधी)

सुनावणी दिवशी म्हणजेच येत्या सोमवारी, आपल्या कारखान्याचे सभासद रजिस्टर नमुना आय ,आणि नमुना जे घेऊनच या अशी तंबी , सोलापूरच्या प्रादेशिक सहसंचालक दराडे साहेब यांनी, सहकार शिरोमणी साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालक तसेच संचालक मंडळास दिली आहे. याच वेळी कारखाना प्रशासनाच्या वर्तणुकीवर ताशेरेहीे ओढले आहेत.

सहकार शिरोमणी साखर कारखान्याची सभासदांप्रती असलेली नकारात्मक भूमिका, चुकीची असल्याचे मत प्रादेशिक सहसंचालकांनी व्यक्त केले आहे. गेल्या सहा महिन्यापासून या कारखान्याचे माजी संचालक ॲड. दीपक पवार यांनी कारखान्यांच्या सभासदांची यादी मागितली होती. यावर प्रादेशिक सहसंचालक (साखर) सोलापूर यांच्याकडे सुनावणीही सुरू आहे. मागील सुनावणी वेळी म्हणजेच १३ सप्टेंबर रोजी, सभासदांची यादी दीपक पवार यांना देण्यात यावी, असे कारखान्याच्या प्रशासनास कळविण्यात आले होते. प्रशासनानेही ते कबूल केले होते. याच वेळी सहाय्यक निबंधक यांनीही याबाबत कारखाना प्रशासनास कळवले होते. परंतु अद्यापही ही यादी पवार यांना दिली नसल्याचे दिसून आल्याने, प्रादेशिक सहसंचालक दराडे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सहकारी संस्था कलम ३२(१) प्रमाणे ॲड. दीपक पवार यांनी कागदपत्रांची फी भरली नाही, अशी सबब कारखाना प्रशासनाने पुढे केली होती. यावर प्रादेशिक सहसंचालक दराडे साहेब यांनी कारखाना प्रशासनाची हजेरी घेतली आहे. कारखान्याचा एखादा सभासद माहिती मागत असल्यास, त्याच्या प्रती असलेली कारखाना प्रशासनाची नकारात्मक भूमिका , या कारखाना प्रशासनाकडून दाखवली जात आहे असे स्पष्ट करून, येत्या सुनावणीवेळी म्हणजेच सोमवार दि. १३ डिसेंबर रोजी, सायंकाळी ४ वाजता, कारखान्याचे सभासद रजिस्टर (आय) तसेच (जे) स्वतः सोबत घेऊन यावे, तसेच याची एक प्रत कार्यालयास पाठवून द्यावी, असे आदेशित केले आहे. यावर हे कारखाना प्रशासन काय करणार ? याकडे पंढरपूर तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.


चौकट

सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे माजी संचालक, ॲड. दीपक पवार यांनी सहा महिन्यापूर्वी कारखाना प्रशासनास सभासदांच्या यादीची मागणी केली होती .यावर प्रादेशिक सहसंचालक (साखर) सोलापूर , यांचेपुढे सुनावणी सुरू आहे. मागील सुनावणीवेळी ही यादी पवार यांना देण्यास, कारखाना प्रशासनाने मान्यता दिली होती. परंतु अद्यापही ही यादी आपणास मिळाली नसल्याचे, दीपक पवार यांनी प्रादेशिक सहसंचालकांना कळवले आहे. त्यावर सोमवार दि. १३ डिसेंबर रोजी सुनावणीवेळी, सभासदांचे रजिस्टर नमुना आय आणि जे सोबत घेऊनच येण्यास , प्रादेशिक सहसंचालक दराडे यांनी कारखाना प्रशासनास कळविले आहे.