*पंढरपूरचं जीएसटी कार्यालय देशात नंबर एकचं ठरेल :-_ मुख्य आयुक्त राजीव कपूर*
पंढरपूर (प्रतिनिधी)
केंद्रीय वस्तू आणि सेवाकर विभागाचे कार्यालय, पंढरपूर येथे नव्याने बांधण्यात आले आहे. सुसज्ज आणि देखणे असे हे कार्यालय भारतातील नंबर एकचे कार्यालय ठरेल, असा विश्वास या विभागाचे प्रधान आयुक्त राजीव कपूर यांनी बोलून दाखवला. सोमवारी या कार्यालयाचा उद्घाटन शुभारंभ त्यांच्या हस्ते पार पडला, यावेळी ते बोलत होते.
यावेळी जीएसटीचे अप्पर आयुक्त वैशाली पतंगे, संयुक्त आयुक्त तांतीयासाहेब, प्रसाद गोडसे, सोलापूरचे सहाय्यक आयुक्त पी. सांबशिवराव, लेखापरीक्षण विभागाचे सहाय्यक आयुक्त पी. व्ही.गागालोलू तसेच पंढरपूर कार्यालयाचे अध्यक्ष एच. के. प्रयाग आदी मान्यवर उपस्थित होते.
तीर्थक्षेत्र पंढरी नगरीतील सेंट्रल जीएसटी कार्यालयाचे उद्घाटन, सोमवारी मोठ्या दिमाखात पार पडले. हे कार्यालय पंढरपूरमध्ये १९८८ साली सुरू झाले होते. मोठमोठे उद्योग आणि कारखानदार यांच्याकडून कर गोळा करणे, हे काम या कार्यालयातून पार पडत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून वस्तू व सेवा कर अनेक वस्तूंवर लावण्यात आला. साहजिकच या कार्यालयाचे काम वाढले आहे.
पंढरपूर बसस्थानकासमोर असणारे हे जीएसटीचे कार्यालय अडगळीत पडल्यात जमा होते. मुख्य आयुक्त राजीव कपूर यांच्या कार्यकाळात या कार्यालयाच्या बांधकामास मंजुरी देण्यात आली. दोन वर्षात हे कार्यालय बांधून पूर्णही झाले. सुमारे २ कोटी २ लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या कार्यालयाने, पंढरपूरच्या सौंदर्यात मोठी भर टाकली
असल्याचे स्पष्टीकरण येथील युवा नेते प्रणव परिचारक यांनी दिले आहे.
सबंध महाराष्ट्रातून आलेल्या जीएसटी विभागातील अधिकाऱ्यांनी या उद्घाटनाच्या कार्यक्रमास हजेरी लावली. पंढरपूर सारख्या ठिकाणी बांधण्यात आलेले जीएसटीचे हे कार्यालय देशातील नंबर एकचे कार्यालय ठरेल, असे मत मुख्य आयुक्त राजीव कपूर यांनी व्यक्त केले.
धार्मिक आणि प्रेरणादायी ठिकाण म्हणून पंढरपूर राज्यात प्रसिद्ध आहे. म्हणूनच या ठिकाणचे कार्यालय बांधण्याची प्रेरणा जीएसटी विभागास मिळाली. या अद्ययावत कार्यालयात काम करताना कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता नक्कीच वाढेल, असा विश्वास अप्पर आयुक्त वैशाली पतंगे यांनी व्यक्त केला.
यावेळी अधीक्षक पी.व्ही. देशमुख, आर. एम.बाशीकर,
डी.ए. इंदापुरे आदींसह या विभागातील अनेक अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री साई यांनी केले तर आभार निरीक्षक भावना निशाल यांनी मानले.
चौकट
काही वर्षांपूर्वी करांची नावे सामान्य जनतेला माहीत नव्हती. परंतु आता " 'जीएसटी कर " सर्वांनाच ठाऊक झाला आहे. या कराची व्याप्ती फार मोठी झाली असून, या विभागाचे विशाल कार्यालय पंढरपूरमध्ये साकारण्यात आले आहे. दरवर्षी ६० कोटी रुपये गोळा करणाऱ्या या कार्यालयाच्या बांधकामासाठी, २ कोटी २ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. या कार्यालयाने पंढरीच्या सौंदर्यात भर पडली आहे. या कार्यालयाचे उद्घाटन सोमवारी पंढरीत मोठ्या थाटात पार पडले.