*बेपत्ता अल्पवयीन मुलीचा तात्काळ शोध* * पो .नि अवचर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलिसांची दमदार कामगिरी*

पंढरपूर (प्रतिनिधी)
पंढरपूर तालुक्यातील अपहरण करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलीचा, अवघ्या ४० तासात शोध लावण्याचे काम, पंढरपूर तालुका पोलिसांनी केले आहे. या संवेदनशील गुन्ह्याची तत्परतेने उकल करण्याचे मोठे काम केले आहे. फिर्याद दाखल झाल्यापासून काही तासातच सदर मुलगी तिच्या मातेच्या ताब्यात देण्यात आल्याने,पोलिसांचे कौतुक होत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मंगळवार दि. १७ ऑगस्ट रोजी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात एक फिर्याद दाखल करण्यात आली होती. या फिर्यादीनुसार एका अल्पवयीन मुलीस , समर्थ राजू कांबळे , रा. आढीव तालुका पंढरपूर याने लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने पळवून नेले होते. सदरचा गुन्हा पोलीस ठाण्यात दाखल करून घेण्यात आला होता. या संवेदनशील गुन्ह्याचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन चवरे यांच्याकडे देण्यात आला होता. या गुन्ह्यातील गंभीरता लक्षात घेत, हेडकॉन्स्टेबल चवरे आणि पो. कॉ.बालाजी कदम यांनी पोलीस निरीक्षक किरण अवचर यांच्या मार्गदर्शनाखाली, तपास सुरू केला. या तपासाची चक्रे वेगाने फिरवली. यावेळी आरोपी समर्थ कांबळे हा, सांगली जिल्ह्यातील जत येथे असल्याची माहिती त्यांना मिळाली. संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांनी तात्काळ जतकडे प्रयाण केले. या ठिकाणी जाऊन खात्री केली असता, आरोपीने पीडित मुलीसह कराडकडे पोबारा केला असल्याचे समजले. या घटनेतील तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे त्यांनी कराड येथे जाऊन , आरोपी समर्थ कांबळे यासह संबंधित अल्पवयीन मुलीस ताब्यात घेण्यात यश मिळवले. गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या ४० तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या, आणि अल्पवयीन मुलीची सुटका केली. सदर मुलगी ही कायदेशीररित्या तिच्या आईच्या ताब्यात सुरक्षितरित्या देण्यात आली आहे. सदर गुन्ह्याची गंभीरता पाहून गुन्ह्याच्या कलमांमध्ये वाढ करण्यात आली असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे.
सदरची कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलिस निरीक्षक किरण अवचर यांच्या नेतृत्वाखाली , पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पो.हे. कॉ. नितीन चवरे, पो. कॉ. बालाजी कदम तसेच सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस अन्वर आतार यांनी शिताफीने पार पाडली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पो.नि. आदिनाथ खरात हे करीत आहेत.