*चंद्रभागा डेअरी आणि सीतारामकडील शेतकऱ्यांचे पैसे परत करा* *सहकार शिरोमणीच्या सभासदांची यादी द्या* *ॲड. दीपक पवार यांचा कल्याणराव काळे यांना उलट सवाल*

पंढरपूर (प्रतिनिधी)
सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी, दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत येत्या सहा महिन्यांत शेतकऱ्यांचे पैसे माघारी देणार असल्याचे सांगितले होते. याचवेळी त्यांनी ॲड. दिपक पवार यांच्याबाबत उलटसुलट विधाने केली होती. यावर ॲड. दीपक पवार यांनी चांगलीच आगपाखड केली आहे . येत्या सहा महिन्यात आपणास चंद्रभागा डेअरी आणि सिताराम कारखान्याच्या शेअर्सपोटी घेतलेली रक्कम द्यावी लागणार आहे ,आणि खरोखरच ही रक्कम आपण देणार असाल तर, ज्यांना ही रक्कम द्यावयाची आहे, त्यांची नावे सहकार शिरोमणी कारखान्याच्या नोटीस बोर्डवर लावावी, तसेच आपण अनेक दिवसापासून मागत असलेली सहकार शिरोमणी कारखान्याची सभासद यादीही देण्यात यावी, असे आवाहन केले आहे. त्यांच्या या आवाहनाने पंढरपूर तालुक्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
सीताराम साखर कारखान्याच्या शेअर्सपोटी सहकार शिरोमणी कारखान्याच्या सभासदांकडून , काळे यांनी ३५ कोटी रुपयांची रक्कम कपात करून घेतली होती. प्रत्यक्षात मात्र वाडीकुरोली पिराची कुरोली अशा तीन गावातील लोकांचे २४ कोटी रुपयांचे शेअर्सची यादी आरओसी पुणे यांच्याकडे दिली आहे. हा सर्व प्रकारंच गोलमाल असून, आपण याबाबत सेबी, इडी तसेच पोलिसात तक्रार दिली असल्याची माहिती पत्रकार परिषद घेऊन त्यांनी दिली होती. यावर कल्याणराव काळे यांनी दोन दिवसांनी पत्रकार परिषद घेत ,विविध विषयांवर चर्चा केली होती. यामध्ये वैयक्तिक टिका टिपणी होत असल्याबाबत नाराजी व्यक्त केली होती.
सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे हे संबंधित प्रकरणात दिशाभूल करीत असून विषयांतर करीत असल्याची टीका ॲड. दीपक पवार यांनी केली आहे. आपला लढा शेतकरी ,ऊस उत्पादक सभासद ,आणि नागरिकांसाठी असून तो भ्रष्ट कारखानदारी विरोधात आहे. कल्याणराव काळे हे आपले नातेवाईक असून, त्यांना आपण फराळीसाठी बोलवू परंतु शेतकऱ्यांच्या प्रश्नात कोणताही मुलाहिजा बाळगणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
कल्याणराव काळे यांच्या प्रश्नास उत्तर देताना त्यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले आहेत. सिताराम कारखान्याची निर्मिती फक्त कल्याणराव काळे यांनी केली होती. तो कारखाना चालविता आला नाही म्हणून विकूनही टाकला .आणि शेतकरी सभासदांचे कोट्यावधी रुपये अडकवून टाकले . वीस वर्षांपूर्वी चंद्रभागा डेअरी निर्माण केली यासाठीही शेतकऱ्यांकडून रुपये गोळा केले .ते अद्यापही दिले नाहीत . दहा वर्षापूर्वी सिताराम कारखान्यासाठी जमा केलेले गाठोडे अद्यापही शेतकऱ्यांना माघारी केले नाही. ही सर्व रक्कम ते सहा महिन्यात देतो असे सांगत असतील तर शेतकरी सभासद सहा महिने थांबायला तयार आहेत, परंतु ज्यांची रक्कम ते देणार आहेत, त्यांची यादी तरी सहकार शिरोमणी साखर कारखान्याच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करावी असे खुले आव्हान ॲडव्हान्स दीपक पवार यांनी कल्याणराव काळे यांना दिले आहे .याचवेळी आपण मागत असलेली सहकार शिरोमणी साखर कारखान्याची सभासद यादी देण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
वैयक्तिक टीकेमुळे कारखान्यास कर्ज मिळत नाही या काळे यांच्या वक्तव्यावर त्यांनी जोरदार टीका केली आहे. कर्ज देण्यासाठी बँका कारखान्याचा खाते उतारा बघतात .आमच्या तक्रारीकडे पाहत नाहीत. स्वर्गीय वसंतदादा काळे यांनी सहकार शिरोमणी कारखान्याची निर्मिती केली होती. त्यावेळी त्यांचे वडील दामू अण्णा पवार हेही कारखाना उभारणीसाठी झटले होते , परंतु आता हा साखर कारखाना ६०० कोटी रुपयांच्या कर्जामध्ये आहे. असे असताना कोणती बँक किती कर्ज देणार ? याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे. एकूणच ॲड. दीपक पवार यांनी कल्याणराव काळे यांचा खरपूस समाचार घेतला आहे आहे.
चौकट
कल्याणराव काळे यांच्या आरोपास ॲड. दीपक पवार यांनी कडकडून विरोध केला आहे. कल्याणराव काळे यांच्याकडून विषय भरकटवीला जात आहे. आपला लढा त्यांच्या विरोधात नसून भ्रष्ट कारखानदारी विरोधात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. चंद्रभागा डेअरी तसेच सिताराम कारखान्यासाठी शेतकऱ्यांकडून पद्धतशीर पैसा गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्याचे काम काळे यांनी केले आहे. गेल्या सहा महिन्यात पैसे परत देणाऱ्या काळे यांनी, ज्यांचे पैसे परत देणार आहात त्यांची यादी प्रसिद्ध करावी, तसेच आपण मागत असलेली सहकार शिरोमणी कारखान्याची सभासद यादीही देण्यात यावी ,असा प्रहार काळे यांच्यावर चढविला आहे.