*विश्वासाला तडा जावू देणार नाही- ऍड. गणेश पाटील*.

करकंब /प्रतिनिधी
कै. यशवंतभाऊ व कै. राजूबापू यांच्या विचारांचा वसा आणि वारसा चालवत असताना त्यांनी केलेले काम देशाचे नेते शरद पवार यांच्यावरील निष्ठा याचे फलित म्हणून एवढया कमी वयात माझ्यावर रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदी निवड करून जो विश्वास दाखवला, माझ्या कार्याला बळ दिले याचा कधीही विसर पडू देणार नाही असे अभिवचन नवनियुक्त जनरल बॉडी सदस्य ऍड. गणेश पाटील यांनी दिले.
ते यशवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भोसे (ता.पंढरपूर) या विद्यालयाच्या वतीने रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदी निवड झालेबद्दल आयोजित केलेल्या सत्कार समारंभ प्रसंगी बोलत होते.
यावेळी विद्यालयाचे प्राचार्य मारुती कारंडे, स्थानिक स्कूल कमिटी सदस्य नागनाथ काळे, जयवंत गावंधरे, सुनील तळेकर, निवृत्ती मस्के, युवराज कोरके आदी उपस्थित होते.
यावेळी प्राचार्य श्री. कारंडे यांनी कै. यशवंतभाऊ व कै. राजूबापू यांनी रयत शिक्षण संस्थेसाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित करून त्यांच्या कार्याचा वेगळा ठसा उमटवला होता त्याच पद्धतीने ऍड. गणेश पाटील यांनी काम करावे आणि त्यांची उत्तरोत्तर प्रगती व्हावी अशा प्रकारच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी पर्यवेक्षक के.डी.शिंदे, सोमनाथ थिटे आदींसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.