*आषाढी वारीची गर्दी अनेक दिवसापासून असतानाही तात्पुरती शौचालये बंदच*! *ठेका किती दिवसाचा अन् अद्यापही काही ठिकाणी पाण्याविना वापर*

पंढरपूर /प्रतिनिधी
पंढरपूरच्या आषाढी वारीत भाविकांच्या सोयीसाठी मोबाईल टॉयलेट उभारण्याचा ठेका दिला जातो. आषाढी एकादशी सोहळा एक दिवसावर येऊन ठेपला, संतांच्या पालख्या पंढरीत शिरल्या, तरीही रस्त्याकडेला उभारण्यात आलेले अनेक ठिकाणची मोबाईल टॉयलेट कुलूपबंदच असून, या ठिकाणी पाण्याचा एक थेंबही नसल्याचा प्रकार आढळून आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सुनावले होते, तरीही शौचालयांची अवस्था जैसे थे च असल्याची परिस्थिती पंढरी नगरीत बाहेरील बाजूस दिसत आहे.
राज्याचे आराध्य दैवत विठुरायाचा आषाढी वारी सोहळा पंढरपूरमध्ये गुरुवारी पार पडत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुधवारीच संध्याकाळी पंढरपूरमध्ये येत आहेत. संतांच्या पालख्या पंढरीत विसावनार आहेत. दहा ते पंधरा लाख भाविक आज पंढरीत दाखल होत आहेत. या भाविकांच्या सोयीसाठी पालखी मार्गावर मोबाईल टॉयलेट उभारण्याचा ठेका प्रशासनाने सारा प्लास्ट या कंपनीकडे दिला आहे. परंतु पंढरी नगरीत मोबाईल टॉयलेटची सर्व ठिकाणाची व्यवस्थाच उभी राहिले नसल्याचे चित्र दिसून येत आहे. रस्त्याच्या कडेला मोबाईल टॉयलेट उभारण्यात आले असले तरी, ते अजूनही कुलूपबंद अवस्थेत आहेत. येथील रेल्वे स्टेशन परिसरात शौचालयांची ही व्यवस्था आहे. कराड रोडवर उभारण्यात आलेले मोबाईल शौचालय कुलूप बंदच असल्याचे दिसून आले आहे. या ठिकाणी तर भाविक पाण्याची बाटली घेऊन उघड्यावर शौचास जात असल्याचे निदर्शनास आले आहे.
आषाढी वारीतील भाविकांना सोयी सुविधा पुरवण्यासाठी कोणतीही काटकसर केली जाणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सुनावले आहे. दोनच दिवसापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरीत येऊन प्रशासनास धारेवर धरले होते. यानंतर तरी प्रशासनात सुधारणा होईल अशी आशा भाविकांना वाटत होती, परंतु येथील मोबाईल टॉयलेटची अवस्था पाहिल्यास , प्रशासन किती निगरगट्ट आहे ? याची कल्पना आल्यावाचून राहत नाही.
दरवर्षी तेच ठेकेदार आणि तेच प्रशासन यांची सांगड अप्रतिम असल्याची खात्री आता पटली आहे. रस्त्याच्या कडेला कुलूपबंद मोबाईल टॉयलेट ठेवून प्रचंड मोठे घबाड लाटणारी ठेकेदारी, या आषाढी वारीत उघड दिसून आली आहे. आषाढी वारी सोहळा एक दिवसावर येऊन ठेपला असतानाही कुलूपबंद शौचालय आणि पाण्याचा एक थेंबही नसलेली त्यांची व्यवस्था, याची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील काय ? येथील प्रशासनास याबाबत जाब विचारतील काय ? असे प्रश्न भाविकांना पडू लागले आहेत.
*निगरगट्ट प्रशासन आणि स्वार्थी ठेकेदारांची आषाढीत चंगळ*
आषाढी वारीमार्गावर भाविकांच्या सुविधेसाठी उभारण्यात आलेली तात्पुरती शौचालय, शोपीस बनली आहेत. कुलूपबंद शौचालय आणि पाण्याचा एक थेंबही नाही, अशा अवस्थेत ही यंत्रणा कार्यरत आहे. ठेकेदारास याबाबत प्रशासनाचा कोणताही धाक नसल्याचे चित्र दिसून येत आहेत. ठेकेदार आणि प्रशासन यांची मिलीभगत असल्याचा प्रकार, येथील मोबाईल टॉयलेट यंत्रणेवरून दिसून येत आहे.
या वारीसाठी नगरपालिका प्रशासनाकडून पाण्याचे टँकर, आणि स्वच्छता करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मजूर लावण्यात आलेले असतात. मात्र दप्तरी नोंदीत असणारी संख्या आणि प्रत्यक्षात हजर संख्या यामध्ये तफावत असल्याचेच प्रकार दरवर्षी होत असतात. यामुळे या वारीत तरी याची ठेकेदार यांचेकडून काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली आहे का? हे तपासून घेणे आवश्यक झाले आहे.