*चुलतीची जमीन पुतण्याने कोतवालाच्या सहकार्याने लाटली ..*. *पंढरपूरच्या तहसीलदारांनी केली वाटणी ....* *पंढरपूर तालुक्यातील करोळे येथील घटना* *प्रहारची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार अन न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा*..

पंढरपूर (प्रतिनिधी)
महसूल विभागातील कोतवालाच्या नावे त्याच्या चुलतीच्या जमिनीचे फसवून वाटप केल्याची घटना ,पंढरपूर तालुक्यातील करोळे येथे घडली आहे . हौसाबाई दगडे यांच्यावर झालेल्या अन्यायास प्रहार जनशक्ती संघटनेने वाचा फोडली आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबतची तक्रार करून, न्याय न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.
पंढरपूर तालुक्यातील करोळे गावच्या वृद्ध महिला हौसाबाई दगडे (वय ६५) यांची फसवणूक झाल्याबाबतची तक्रार ही महिला आणि प्रहार संघटनेकडून करण्यात आली आहे . या महिलेचा पुतण्या आणि जो गावातील कोतवालपदी कार्यरत आहे, त्याने पंढरपूरच्या तहसीलदारांना हाताशी धरून , संबंधित महिलेची फसवणूक केली आहे . ही महिला दुसऱ्याच्या शेतात गेली असता, संजय गांधी निराधार योजनेतून प्रकरण करून देतो, आणि तुला पगार चालू करतो असे सांगून, पुतन्याने तिच्या अंगठ्याचे ठसे कागदपत्रांवर घेतले आणि तिच्या नावची २ एकर ३० गुंठे जमीन स्वतःच्या नावे करून घेतली .सखाराम तुळशीराम दगडे कोतवालाने हे काम पंढरपूर तहसीलमधील अधिकाऱ्यांना हाताशी धरून करून घेतले .हा प्रकार लक्षात येताच हौसाबाई दगडे यांनी तहसीलदारांकडे घडला प्रकार सांगून न्यायाची मागणी केली. या संदर्भात जिल्हाधिकारी यांना लेखी पत्राद्वारे कळविले ,परंतु घडल्या प्रकाराबाबत दखल घेतली गेली नाही .यानंतर हौसाबाई दगडे यांनी हा प्रकार प्रहार संघटनेचे पदाधिकारी नाना इंगळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सांगितला, आणि या प्रकरणाचे पदर उलगडण्यास सुरुवात झाली.
प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवासी जिल्हाधिकारी पवार मॅडम यांची भेट घेऊन , संबंधित वृद्ध महिलेला न्याय देण्याची मागणी केली .यावेळी त्यांनीही तत्काळ पंढरपूरच्या तहसीलदारांना फोन करून, संबंधित आदेश रद्द करून घ्यावा, आणि हौसाबाई दगडे यांच्यावर झालेला अन्याय दूर करावा असे सांगितले असल्याचे प्रहार सांगण्यात आले आहे . हौसाबाई दगडे यांचा पुतण्या सखाराम तुळशीराम दगडे यांच्या नावे करण्यात आलेली जमीन, हौसाबाई दगडे यांच्या नावे करण्यात यावी ,अशी मागणी प्रहार संघटनेने लावून धरली आहे. पंढरपूरच्या तहसीलदारांनी यासंदर्भात योग्य ती कार्यवाही न केल्यास, प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल ,असा इशारा या संघटनेने दिला आहे .यावेळी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के, शहरअध्यक्ष अजित भाऊ कुलकर्णी ,शहर कार्याध्यक्ष खलिद मणियार, पंढरपूरचे तालुकाध्यक्ष नानासो इंगळे, हौसाबाई दगडे आणि प्रहार संघटनेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
चौकट
महसूल विभागात कोतवाल म्हणून काम करणाऱ् आणि पुतण्या तुळशीराम दगडे यांनी त्यांची चुलती हौसाबाई दगडे, हिच्या दोन एकर ३० गुंठे जमिनीवर डल्ला मारला असल्याची तक्रार प्रहार संघटनेने केली आहे .पंढरपूर तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून हा प्रकार करण्यात आला असून ,यासंदर्भात हौसाबाई दगडे यांना न्याय न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.