*त्या हॉस्पिटने माझ्या वडिलांवर काय उपचार केले ,याचा रिपोर्टही दिला नाही* *जाताना चालत गेलेला पेशन्टचा मृतदेहच घरी आणला* *सोलापूर महापालिकेकडून कागदपत्रे उशिरा मिळवली ,त्यातही तफावतच आढळतेय* *मयत हिंदुराव अडसूळ यांचा मुलगा अमर अडसूळ यांची पत्रकारांना माहिती*

पंढरपूर /प्रतिनिधी
सोलापूर येथील नवनीत हॉस्पिटलचे चालक डॉ. नितीन तोषणीवाल यांच्या बेफिकीर आणि बेजबाबदार वर्तनामुळेच आपल्या कुटुंबाचा आधारवड संपला असल्याचे मत, सुस्ते येथील बागायतदार अमर अडसूळ यांनी व्यक्त केले आहे. १८ जानेवारी रोजी त्यांचे वडील हिंदुराव गोवर्धन अडसूळ यांचा सोलापूर येथील हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. या मृत्यूस फक्त आणि फक्त डॉ. नितीन तोष्णीवालच जबाबदार असल्याचा आरोप अमर अडसूळ यांनी केला आहे. याविषयी त्यांनी पोलीस आयुक्त सोलापूर, तसेच महाराष्ट्र राज्य मेडिकल कौन्सिलकडेही तक्रार दाखल केली आहे.
सुस्ते गावचे प्रतिष्ठित नागरिक हिंदुराव अडसूळ (वय ६६) यांचा जानेवारी महिन्यात मृत्यू झाला. १५ जानेवारी रोजी त्यांना चक्कर आल्यासारखे झाले होते. यावर त्यांना सोलापूर येथील वळसंगकर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. यावेळी त्यांनी बीपीची गोळी बंद करा सर्व काही ठीक होईल असे सांगून माघारी पाठवले. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा हिंदूराव अडसूळ यांना गरगरल्यासारखे झाले, म्हणून या गावातीलच डॉ. सालविठ्ठल यांच्याकडे नेण्यात आले. यावेळी त्यांनी सोलापूर येथील नवनीत हॉस्पिटलचे डॉ. नितीन तोष्णीवाल यांना फोन केला. ते हॉस्पिटलमध्ये असल्याची खात्री करून, अडसूळ यांना या हॉस्पिटलमध्ये पाठवले. रात्री दहाच्या सुमारास अडसूळ कुटुंब तेथे पोहोचले. यावेळी डॉक्टर हॉस्पिटलमध्ये हजर नव्हते. हॉस्पिटलमधील दुसरे सीनियर डॉ. संग्राम किल्मिषे यांनी हिंदुराव अडसूळ यांना ॲडमिट करून घेतले. यावेळी त्यांना झोपेची इंजेक्शन देण्यात आली. डॉ. नितीन तोष्णीवाल मात्र पुढील बारा तास दवाखान्याकडे फिरकलेच नाहीत. दुसऱ्या दिवशी ते दवाखान्यात आल्यानंतर त्यांना पेशंटला भेटण्याची परवानगी, अमर अडसूळ यांनी मागितली. यावर ते प्रचंड संतापले. माझ्यासमोर कलेक्टर आणि आयपीएस अधिकारी हात जोडुन उभे राहतात आणि तुमचे काय ? असे म्हणत, मला तुम्हाला बोलायला वेळ नाही असे सांगून तेथून निघून गेले. या नंतर दुसऱ्या दिवशी मंगळवेढा येथील हुरडा पार्टीस गेले. हिंदुराव अडसूळ यांची तब्येत वरचेवर खालावत गेली. यावर दुसऱ्या दिवशी दवाखान्यात न येताच , त्यांनी आधार हॉस्पिटलमधूनच निरोप पाठविला ,आणि हिंदुराव अडसूळ यांना आधार हॉस्पिटलमध्ये ट्रान्सफर करण्यात आले. याठिकाणी येऊनही डॉक्टर तोष्णीवाल यांनी अडसूळ यांच्या नातेवाईकांबरोबर हुज्जत घातली. याचवेळी डॉक्टर तोष्णीवाल यांच्याकडून हिंदुराव अडसूळ यांच्या उपचारात काहीतरी चूक झाली असल्याचे लक्षात आले. नंतर काही तासातच हिंदुराव अडसूळ हे मयत झाले. ही बातमी वाऱ्यासारखी सुस्ते परिसरात पसरली. यानंतर पंधरा दिवस अडसूळ कुटुंब दुःखाच्या खाईत लोटले गेले.
आपल्या वडिलांचे बरे वाईट हेच डॉक्टरांमुळेच झाल्याची खात्री वाटल्याने, अमर अडसूळ यांनी याबाबत पाठपुरावा सुरू ठेवला. डॉक्टरांना उपचाराची माहिती मागितली. सोलापूर महानगरपालिकेकडे याबाबतची माहिती मागितल्यानंतर मात्र, दोन वेळा वेगवेगळी माहिती देण्यात आली. थोडी चक्कर आल्यावरून स्वतःच्या पायाने चालत केलेला रुग्ण चार-पाच दिवसातच नाहीसा झाला. सुस्ते परिसर आणि अडसुळ कुटुंब दुःखाच्या खाईत लोटले गेले. अमर अडसूळ यांनी याबाबत महाराष्ट्र राज्य मेडिकल कौन्सिलकडे तक्रार केली आहे. डॉ. नितीन तोष्णीवाल यांच्या बेफिकीरीमुळेच आपले वडील मृत्युमुखी पडले असून, याबाबत तोषनीवाल यांच्यावर जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आपला लढा सुरूच राहणार असल्याचे मत अमर अडसूळ यांनी व्यक्त केले आहे.
चौकट
सुस्ते येथील प्रतिष्ठित नागरिक हिंदुराव अडसूळ यांचा जानेवारी महिन्यात अल्पशा आजाराने मृत्यू झाला. परंतु हा मृत्यू आजाराने झाला असून सोलापूर येथील डॉ. तोष्णीवाल यांच्या हलगर्जीपणाचा परिपाक असल्याचे मत अमर अडसूळ यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी यासंदर्भात पोलीस आयुक्त तसेच महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडेही दाद मागितली आहे. तोष्णीवाल यांच्यावर गुन्हा दाखल होईपर्यंत आपला लढा सुरूच राहणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे