*लपविला जातोय कारभार ...* *कासेगांव ग्रामपंचायतीविरोधात महिला सदस्याची तक्रार ..* *प्रस्थापिता  विरोधात महिला सदस्यांचा एल्गार*

*लपविला जातोय कारभार ...*  *कासेगांव ग्रामपंचायतीविरोधात महिला सदस्याची तक्रार ..*  *प्रस्थापिता  विरोधात महिला सदस्यांचा एल्गार*

पंढरपूर (प्रतिनिधी)

विरोधी पार्टीच्या सदस्यांना लपवून, कासेगाव ग्रामपंचायतीचा कारभार सुरू असल्याची तक्रार, येथील महिला सदस्यांने केली आहे. याबाबत ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक आणि सत्ताधारी पार्टीच्या सदस्यांविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागितली आहे . ग्रामपंचायत सदस्या सविता मारुती काळे यांनी घेतलेल्या या भूमिकेची चर्चा , तालुक्यातील ग्रामस्तरावर मोठ्या खुबीने केली जात आहे.


पंढरपूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या , कासेगाव ग्रामपंचायतीमध्ये अजब कारभार घडत असल्याचा प्रकार , येथील महिला सदस्या सविता मारुती काळे यांनी उजेडात आणला आहे . विरोधी सदस्यांना लपवून कारभार होत असल्याची तक्रार , त्यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे . या प्रकाराने पंढरपूर तालुक्याच्या प्रशासन वर्गात मोठी खळबळ उडाली आहे.

 गेल्या सात महिन्यापूर्वी या ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडली आहे. या निवडणुकीत सर्वपक्षीय आघाडीने १७ पैकी १५ जागा जिंकून वर्चस्व प्रस्थापित केले आहे . याच पार्टीची सत्ता या ग्रामपंचायतीवर आहे . याचवेळी विरोधी आ. अवताडे गटाचे दोन सदस्य निवडून आले आहेत. यामध्ये सविता मारुती काळे तसेच सुमन पांडुरंग लिंगे यांचा समावेश आहे. येथील वार्ड क्रमांक ४ मधून सविता काळे या सदस्य निवडून आल्या होत्या. याच महिला सदस्यांने ग्रामपंचायत कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून चार मासिक बैठका पार पडल्या , या बैठकांमधील विषय तसेच मंजूर करण्यात आलेल्या कोणत्याही विषयांची माहिती , अद्यापपर्यंत आपणास देण्यात आली नाही . याचवेळी बैठकांना उपस्थित राहण्यासंदर्भात कळविण्यात आलेले नाही,  एवढेच काय तर संबंधित विषयांची माहिती मागूनही ग्रामविकास अधिकाऱ्यांकडून दिली जात नसल्याची तक्रार, सविता काळे यांनी केली आहे.  ग्रामपंचायतीच्या बैठकांमध्ये ग्रामसेवक येलपले यांच्याकडून अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचाही खुलासा काळे यांनी केला आहे . या प्रकाराने तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असणाऱ्या कासेगाव ग्रामपंचायतीमध्ये सुरू असलेल्या अजब कारभाराचा पर्दापाश केला आहे.


लोकशाहीमध्ये विरोधी गटास अनन्यसाधारण महत्त्व आहे. विरोधी गटाच्या भूमिकेवर सत्ताधाऱ्यांचे राजकारण अवलंबून असते . याचवेळी विरोधकांना विश्‍वासात घेत काम केल्यास , अशक्य ते काम होऊ शकते. या गोष्टी सर्वमान्य आहेत. असे असताना कासेगाव ग्रामपंचायतीमध्ये एका महिला सदस्याची होत असलेली कुचंबना, आणि ग्रामसेवकाकडून होत असलेली मानहानी यास वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी पाठीशी घालणार की , संबंधितांना समज देणार ? याकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे . असे प्रकार गावोगाव होत राहिल्यास ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये नागरिकास रसच राहणार नाही. आणि वर्चस्ववाद वाढण्याचा मोठा धोका असल्याची खंत, कासेगाव येथील ग्रामपंचायत सदस्या सविता काळे यांनी व्यक्त केली आहे.