*यात्राकर अनुदानातून पंढरपूर नगरपरिषदेला ५ कोटींचा निधी प्राप्त* *आमदार समाधान आवताडे यांच्या पाठपुराव्याला यश;* *विकासकामांना मिळणार गती*
पंढरपूर / प्रतिनिधी
आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूर नगरीतील विविध विकास कामांना चालना देण्यासाठी राज्य शासनाने यात्राकर रद्द केल्यामुळे नगरपरिषदांना देण्यात येणाऱ्या सहायक अनुदान योजनेअंतर्गत सन २०२६-२७ साठी एकूण ८ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून, त्यापैकी पंढरपूर नगरपरिषदेला तब्बल ५ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. यासंदर्भातील शासन निर्णय नुकताच निर्गमित करण्यात आला आहे. याबाबत पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याने भाविक आणि स्थानिक नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. या निधीमुळे पंढरपूर शहरातील विविध नागरी सुविधा व विकासकामांना गती मिळणार आहे.
राज्यातील त्र्यंबक, आळंदी, जेजुरी, पंढरपूर, तुळजापूर, रामटेक, पैठण आणि अक्कलकोट या आठ यात्रास्थळ नगरपरिषदांच्या हद्दीत पूर्वी आकारला जाणारा यात्राकर बंद केल्यानंतर शासनाकडून सहायक अनुदान दिले जाते. यंदा आमदार समाधान आवताडे यांच्या पाठपुराव्यामुळे पंढरपूरला संपूर्ण ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, उर्वरित सात नगरपरिषदांसाठी एकूण ३ कोटी ७५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शासनाने हा निधी कोणतीही कपात न करता तात्काळ संबंधित नगरपरिषदांना वितरित करण्याचे निर्देश दिले आहेत.
तसेच निधीचा विनियोग नियमानुसार करून त्याबाबतची उपयोगिता प्रमाणपत्रे संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांकडून प्राप्त करून महालेखापाल कार्यालयाकडे सादर करण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. निर्धारित मुदतीत निधी खर्च न झाल्यास अखर्चित रक्कम व्याजासह शासनाच्या खात्यात जमा करावी लागणार आहे.
आमदार समाधान आवताडे यांनी सदर निधीबाबत वारंवार शासन दरबारी पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांमुळेच पंढरपूर नगरपरिषदेला ५ कोटी रुपयांचे अनुदान मिळाल्याची भावना नागरिक व भाविकांमधून व्यक्त केली जात आहे. या निधीमुळे आगामी काळात शहरातील मूलभूत सुविधा आणि विकासकामांना नवी गती मिळणार आहे.