*मुंढेवाडी येथील भीमा नदीवरील मंजूर पुलाचे 'पूल कम बंधाऱ्यात रूपांतर करा; आमदार प्रशांत परिचारकांची मुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी* *मुख्यमंत्र्यांची सकारात्मक भूमिका; तातडीने कार्यवाही करण्याचे संबंधित विभागांना आदेश, प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचे दिले आश्वासन*

*मुंढेवाडी येथील भीमा नदीवरील मंजूर पुलाचे 'पूल कम बंधाऱ्यात रूपांतर करा; आमदार प्रशांत परिचारकांची मुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी*  *मुख्यमंत्र्यांची सकारात्मक भूमिका; तातडीने कार्यवाही करण्याचे संबंधित विभागांना आदेश, प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचे दिले आश्वासन*

पंढरपूर/प्रतिनिधी 

 पंढरपूर तालुक्याच्या जलसंधारणाला आणि दळणवळणाला नवी दिशा देणाऱ्या एका महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी आमदार प्रशांत परिचारक यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतली आहे. अनवली – मुढेवाडी – अजनसोंड (प्रजिमा-३३) मार्गावरील भीमा नदीवर मंजूर झालेल्या पुलाचे रूपांतर पूल कम बंधारा मध्ये करण्यात यावे, अशी आग्रही मागणी आमदार प्रशांत परिचारक यांनी मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे एका विशेष निवेदनाद्वारे केली आहे.

केवळ पूल बांधण्याऐवजी 'पूल कम बंधारा' उभारल्यास या भागातील वाहतुकीसोबतच जलसंधारणाचाही ऐतिहासिक प्रश्न सुटणार असून शासनाच्या कोट्यवधी रुपयांची बचत होणार असल्याचे आ.परिचारक यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. यावर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अत्यंत सकारात्मक भूमिका घेत, संबंधित विभागांना तातडीने तांत्रिक बदल व कार्यवाही करण्याचे निर्देश दिले असून हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचे ठोस आश्वासन दिले असल्याची माहिती आमदार प्रशांत परिचारक यांनी दिली.

सन २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात भीमा नदीवर मोठ्या पुलासाठी *२५.१९ कोटी रुपयांचा निधी* मंजूर करण्यात आला असून, या कामाची निविदा प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात आहे. मात्र, सध्या सोलापूर शहराला पाईपलाईनद्वारे थेट पाणीपुरवठा केला जाणार असल्याने, भविष्यात उजनी धरणातून भीमा नदीपात्रात पाणी सोडण्याचे प्रमाण अत्यंत मर्यादित राहण्याची भीती आहे.

पंढरपूर शहरालगतचे चंद्रभागा वाळवंट, नदीपात्र कोरडे राहिल्यास वारकरी व भाविकांना मोठ्या पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो.

या प्रश्नाबाबत माढा व पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधींना या अत्यंत महत्त्वाच्या लोकहिताच्या प्रश्नात गांभीर्याने लक्ष घालावे असे आवाहन आ.प्रशांत परिचारक यांनी केले आहे.

मुंढेवाडी येथे जर 'पूल कम बंधारा' उभारला, तर पावसाळ्यातील मुबलक पाण्याचा साठा वर्षभर उपलब्ध राहील. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या बंधाऱ्यामुळे ऐतिहासिक चंद्रभागा वाळवंटात तब्बल चार ते पाच फूट पाणी साठा उपलब्ध राहणार आहे. परिणामी, पंढरपूर शहर व परिसरातील भूजल पातळीत मोठी वाढ होईल, शेतकऱ्यांच्या शेतीला हक्काचे पाणी मिळेल, आणि चंद्रभागा नदीत वर्षभर पाणी टिकून राहिल्याने पंढरपुरात येणाऱ्या लाखो भाविकांना पवित्र स्नानासाठी हक्काचे पाणी उपलब्ध होणार आहे.

सध्या मंजूर असलेल्या पुलाच्या आराखड्यात आवश्यक तांत्रिक बदल करून एकाच वेळी 'पूल कम बंधारा' उभारल्यास, भविष्यात स्वतंत्र बंधाऱ्यासाठी लागणारा शासनाचा कोट्यवधी रुपयांचा अतिरिक्त खर्च पूर्णपणे वाचणार आहे. या कामाची निविदा प्रक्रिया सुरू असून प्रत्यक्ष काम सुरू होण्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभाग व जलसंपदा विभागामार्फत तातडीने तांत्रिक बदल करून मंजुरी द्यावी, अशी मागणी आमदार प्रशांत परिचारक यांनी केली होती. मुख्यमंत्र्यांनी यावर तात्काळ सकारात्मक पाऊल उचलल्यामुळे पंढरपूरच्या नदीपात्रातील पाण्याचा आणि चंद्रभागेच्या वैभवाचा हा प्रश्न आता कायमचा सुटणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.