*पंढरीत आषाढी वारीनिमित्त फुटपाथ अतिक्रमण मुक्त करण्यासाठी जिकिरीचे प्रयत्न*   *प्रशासनाकडून अतिक्रमण हटाव मोहीम जोरदार सुरू* 

*पंढरीत आषाढी वारीनिमित्त फुटपाथ अतिक्रमण मुक्त करण्यासाठी जिकिरीचे प्रयत्न*    *प्रशासनाकडून अतिक्रमण हटाव मोहीम जोरदार सुरू* 

 पंढरपूर /प्रतिनिधी 

आषाढी यात्रा शुद्ध एकादशी 25 जुलै 2026 रोजी असून, आषाढी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी लाखो भाविक पंढरपुरात येतात. येणाऱ्या वारकरी भाविकांना तसेच स्थानिक नागरिकांना पंढरपूर शहरात रहदारीचा कोणताही त्रास होऊ नये. यासाठी आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर  पंढरपूर नगरपालिका व पोलीस प्रशासनाच्यावतीने संयुक्तपणे अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली असल्याची माहिती मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली. 

   आषाढी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी सुमारे 18 ते 20 लाख भाविक दर्शनाला येतील असा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर गर्दीच्या ठिकाणी तसेच मंदिर व परिसरातील अतिक्रमणे काढण्यास प्रशासनाने मंगळवार दिनांक 30 जून पासून अतिक्रमण मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्यासह 25 पोलीस व नगरपालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांचा पथकात समावेश असून, हे पथक जेसीबी, ट्रॅक्टर आणि टेम्पोसह रस्त्यावर उतरून अतिक्रमणावर कारवाई करत आहे.

       मंगळवार दिनांक 30 जून पासून छत्रपती शिवाजी चौक ते अर्बन बँक, अर्बन बँक ते इंदिरा गांधी चौक, इंदिरा गांधी चौक ते सावरकर चौक  तसेच भाई राऊळ पुतळा चौक ते छत्रपती शिवाजी चौक (स्टेशन रोड) येथील अतिक्रमणे काढण्यात आली आहेत. पंढरपूर शहरात अतिक्रमण केलेल्या व्यापाऱ्यांना व विक्रेत्यांना अतिक्रमण काढण्याबाबतच्या सूचना नगरपालिका प्रशासनाने दिल्या होत्या, मात्र सदर अतिक्रमण संबंधितांनी काढले नाही. त्यामुळे कारवाई करावी लागत आहे. शहरातील सर्वच भागात अतिक्रमणाची कारवाई पोलीस प्रशासन व नगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येणार असल्याचेही, प्रांताधिकारी सचिन इतापे, सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत ढगळे  यांनी सांगितले.
                   ००००००