*अपघातातून सावरल्यानंतर मनसे नेते दिलीप धोत्रे पुन्हा जनसेवेसाठी मैदानात* *बापूंच्या विकासकामांच्या पाहणीने जनसेवेला नवीन सुरुवात*
पंढरपूर / प्रतिनिधी
मुंबई-पुणे महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झाल्यानंतर उपचार घेऊन पूर्णपणे सावरलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप धोत्रे पुन्हा एकदा जनतेच्या सेवेसाठी सक्रिय झाले आहेत. रविवारी त्यांनी नगरसेविका माधुरीताई दिलीप धोत्रे यांच्या विकास निधीतून मंजूर करण्यात आलेल्या विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करत जनतेप्रती असलेली बांधिलकी अधोरेखित केली.
प्रभाग क्रमांक १७ मधील नागरिकांना दिलेले विकासाचे आश्वासन पूर्ण करण्याच्या दृष्टीने सुरू असलेल्या कामांचा आढावा घेताना दिलीप धोत्रे यांनी जगदंबा वसाहतीतील ड्रेनेज लाईनच्या पाईपलाईनचे काम तसेच परिसरात उभारण्यात येत असलेल्या व्यायाम शाळेच्या कामाची पाहणी केली. संबंधित कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण व्हावीत, अशा सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या.
गोरगरीब व सर्वसामान्य जनतेचे आधारवड म्हणून ओळख असलेल्या दिलीप धोत्रे यांच्या अपघाताची बातमी समोर आल्यानंतर त्यांच्या प्रकृतीबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत होती. विविध स्तरांतून त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करण्यात आल्या होत्या. जनतेच्या शुभेच्छा आणि आशीर्वादामुळे ते सुखरूप बरे झाल्याची भावना त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त करण्यात आली होती.
उपचारानंतर दिलीप धोत्रे पुन्हा एकदा सक्रिय होत विकासकामांच्या पाहणीपासून जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या पुनरागमनामुळे कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, आगामी काळात विकासकामांना आणखी गती मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.