*उजनीच्या पाणी प्रश्नावरून स्वाभिमानी आक्रमक* *पालकमंत्री अन उपमुख्यमंत्र्यांवर डागल्या तोफा*

*उजनीच्या पाणी प्रश्नावरून स्वाभिमानी आक्रमक*
*पालकमंत्री अन उपमुख्यमंत्र्यांवर डागल्या तोफा
पंढरपूर /प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्याचे पालक मंत्री धूर्त आणि लबाड आहेत. इंदापूरला गेल्यावर एक बोलतात आणि सोलापूरला आल्यावर वेगळेच बोलतात. लाकडी निंबोडी पाणी योजना राबवून त्यांचे हे रूप उघड झाले आहे. सोलापूर जिल्ह्याच्या वाट्याचे पाणी पळवाल तर याद राखा, रक्ताचे पाट वाहतील... असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन पाटील यांनी दिला. पंढरपूर तालुक्यातील अनवली येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रस्ता रोको आंदोलन पुकारण्यात आले होते. या आंदोलनामुळे सुमारे अडीच तास वाहने दुतर्फा थांबली होती.
सोलापूर जिल्ह्यात उजनीच्या पाण्यावरून रान चांगलेच पेटले आहे. बारामती आणि इंदापूर तालुक्यासाठी मंजूर करण्यात आलेली लाकडी निंबोडी पाणी पुरवठा योजना पालकमंत्री दत्ता भरणे अन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वादात घालणारी ठरली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवार दि. २४ मे रोजी अनवली येथे रस्ता रोको करण्यात आला. पंढरपूर मंगळवेढा रोड वर करण्यात आलेल्या या रस्ता रोकोमध्ये शेकडो शेतकरी सामील झाले होते.
सोलापूर जिल्ह्यावर अन्याय करणारी लाकडी निंबोडी योजना रद्द करा, पाणी वाटप लवादनुसार सोलापूर जिल्ह्याच्या वाट्याला आलेल्या पाण्याची प्रसिद्धी करून, त्यावर कायदा करा, सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा मोहोळ आणि इतर तालुक्यातील सर्व पाणी योजना आधी पूर्ण करा, मगच लाकडी लिंबोडी योजना घोषित करा, यासह अनेक मागण्या या आंदोलनावेळी करण्यात आल्या.
जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना पालक या शब्दाचा अर्थ उमगला नाही . हा अर्थ त्यांनी पुस्तकात शोधावा. पालकमंत्री धूर्त आणि लबाड आहेत. इंदापुरात गेल्यावर एक बोलतात, आणि सोलापूरला आल्यावर वेगळीच भूमिका मांडतात, असे सांगून जिल्हाध्यक्ष सचिन पाटील यांनी त्यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरतीही सडकून टीका केली.
सोलापूर जिल्ह्याच्या वाट्याचे पाणी सोलापूरला द्या आणि, देणं होत नसेल तर आमच्या जमिनी परत करा , आणि भीमा नदी नैसर्गिकरित्या वाहू द्या, तिला अडवू नका, असा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा संघटक शहाजहान शेख, स्वाभिमानीचे नेते सचिन पाटील, तानाजी बागल, रणजित बागल, सचिन आटकळे ,साजन शेख, बाहुबली सावळे, दीपक भोसले, बिरू कोकरे, दादासाहेब कवडे, विक्रम भोसले ,सचिन घोडके ,नामदेव कोरके ,सुधाकर मोरे, चंद्रकांत सावंत ,सचिन बागल यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
चौकट
बारामती आणि इंदापूर या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली लाकडी निंबोडी योजना मोठ्या वादात सापडली आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यावर सकारात्मक बोलत असले तरीही, सोलापूर जिल्ह्यात या योजनेविषयी मोठी नाराजी पसरली आहे. ठीकठिकाणी आंदोलने होत आहेत .पंढरपूर मंगळवेढा रोडवर स्वाभिमानीच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनात तर उपमुख्यमंत्र्यांनाच ललकारण्यात आले आहे.