*पंढरीतील घरकुलधारकांच्या घरांसाठी मनसे आक्रमक* *मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन* *दिला आंदोलनाचा इशारा*

*पंढरीतील घरकुलधारकांच्या घरांसाठी मनसे आक्रमक*  *मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन*  *दिला आंदोलनाचा इशारा*

पंढरपूर /प्रतिनिधी


नागरिकांकडून पैसे घेऊनही घरकुले न दिल्याबद्दल, पंढरपूरमधील मनसे आक्रमक झाली असून, मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली, पंढरपूर नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. प्रसंगी आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.


पंढरपूर नगरपरिषदेने पंतप्रधान घरकुल योजना मोठ्या प्रमाणावर राबवण्याचे ठरवले होते. यासाठी आराखडा तयार करून ,बिल्डिंग उभी करण्यात आली. यामध्ये घरकुलधारकांकडून ठराविक रक्कम घेऊन, घरकुले देण्याचे निश्चित करण्यात आले .शहरातील ४९२ नागरिकांनी घरकुलासाठी नगरपालिकेकडे पैसे भरले. पैसे भरलेल्या नागरिकांना नोव्हेंबर २०२१ मध्ये घरकुले देण्याचे जाहीर करण्यात आले होते. परंतु आजतागायत त्यांना घरकुले देण्यात आली नाहीत. नगरपालिकेकडून वेठीस धरण्यात आलेले हे नागरिक मनसे नेते दिलीप धोत्रे यांना भेटले, आणि मनसेने आक्रमक पवित्रा घेतला.


शुक्रवार दि. १९ ऑगस्ट रोजी मनसे नेते आणि इतर मनसेचे पदाधिकारी मुख्याधिकारी अरविंद माळी यांना भेटले. त्यांना रीतसर निवेदन देण्यात आले. मनसे नेते दिलीप धोत्रे , नगरसेवक आदित्य फत्तेपुरकर, मनसे शहर अध्यक्ष संतोष कवडे, विभाग अध्यक्ष नागेश इंगोले, माजी नगरसेवक महेश ख्रिस्ते आणि घरकुल लाभार्थी यांनी मुख्याधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली.

याबाबत बोलताना दिलीप धोत्रे यांनी सांगितले की, घरकुलधारकांनी बँकेची कर्जे काढून, दागिने गहाण ठेवून, घरासाठीची रक्कम नगरपालिकेकडे भरली आहे. त्यांना घरकुलाचा ताबा देण्यापासून वंचित ठेवण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येकास स्वतःचे घर असावे, या उद्देशाने ही योजना आखली होती. या योजनेस पंढरपूर नगरपालिकेने हरताळ फासला आहे. यासंदर्भात आपण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या माध्यमातून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहोत. येथील परिस्थितीची त्यांना कल्पना देणार आहोत.