*वृद्ध मातेस मुलांकडूनच मारहाण* *लक्ष्मी टाकळी येथील त्या दोघांवर गुन्हा दाखल*

पंढरपूर /प्रतिनिधी
स्वतःच्या वृद्ध आईस तिच्या मुलांनीच बेदम मारहाण करून जखमी केल्याची घटना पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथे घडली आहे . याप्रकरणी आईस मारहाण करणाऱ्या दोन्ही मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली असून , पोलिसांचा तपास सुरू आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सौ कमल संभाजी देठे (वय ६०) रा.लक्ष्मी टाकळी ता.पंढरपूर हिने तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार तिची मुले सीताराम संभाजी देठे आणि पांडुरंग संभाजी देठे यांनी तिला दमदाटी करून बेदम मारहाण केली आहे याबाबत पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की , कमल संभाजी देठे ही महिला तिच्या शेतामधील वस्तीवर राहत होती. तिची मुले सिताराम आणि पांडुरंग हे नेहमीच तिला मारहाण करत होते. मुलांच्या त्रासास कंटाळून रविवारी ती आपले प्रापंचिक सामान गुंडाळून गावामध्ये राहावयास निघाली होती . यावेळी सदर दोन्ही मुलांनी तिला शिवीगाळी , दमदाटी करून लाथा-बुक्क्यांनी तसेच काठीने मारहाण करून जखमी केले आहे. ही घटना रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे . याप्रकरणी सीताराम संभाजी देठे आणि पांडुरंग संभाजी देठे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . वृद्ध महिलेस दमदाटी आणि मारहाण करून जखमी केल्याबाबत , त्यांच्यावर भादवि कलम ३२४,३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . याप्रकरणी पुढील तपास तालुका पोलीस ठाण्यातील पोलिस करीत आहेत.