*सरकारी वसुलीस टाळाटाळ केल्याप्रकरणी पंढरपूरचे तहसीलदार सुशील बेल्हेकर यांच्या निलंबनाची मागणी* *आर.आर.पाटील लोकविकास प्रतिष्ठानचा 27 डिसेंबर रोजी उपोषणाचा इशारा*
पंढरपूर /प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातून बेकायदा उत्खनन केल्यामुळे ,अनेक बांधकाम व्यवसायातील कंपन्यांना कोट्यावधी रुपयांचे दंड आकारण्यात आले आहेत. हे दंड वसूल करण्यात आलेले नाहीत .पंढरपूरचे तहसीलदार सुशील बेल्हेकर तसेच तालुक्यातील खनिकर्म अधिकारी सचिन शेंडगे यांच्या या कृतीस, अर्थसंबंधाची जोड असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी या दोघांची चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात यावे , अशी मागणी आर आर पाटील लोकविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष दादासाहेब चव्हाण यांनी राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली आहे .या प्रकरणाने पंढरपूर तालुक्यातील सर्वच गोटात खळबळ उडाली आहे.
मंगळवार दि.७ डिसेंबर रोजी यासंबंधीचे निवेदन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह, राज्याचे विभागीय आयुक्त यांना समक्ष भेटून देण्यात आले आहे. पंढरपूर तालुक्यातील शेवते,पेहे, नेमतवाडी ,भंडीशेगाव ,गादेगाव, यासह अनेक गावांतून मुरूम आणि दगडाचे उत्खनन करण्यात येत असल्याची तक्रार ,दादासाहेब चव्हाण यांनी केली होती. यासंदर्भात पंढरपूरच्या तत्कालीन तसेच आज रोजीच्या तहसीलदारांनी तात्काळ पंचनामे केले होते. यावर काही ठिकाणी दंड आकारण्यात आला होता , तर विद्यमान तहसीलदार बेल्हेकर यांच्या काळात फक्त पंचनामेच होऊन पडले आहेत. यावर दंडाची आकारणी अद्याप झालेली नाही .
या सर्व प्रकरणांबाबत गेल्या ५ महिन्यात,११ लेखी पत्रांद्वारे चव्हाण यांनी तहसीलदारांकडे विचारणा केली आहे . परंतु त्यांच्या एकाही पत्रास उत्तर देण्यात आलेले नाही. याशिवाय पंढरपूर तालुक्यातून उत्खणन केल्याप्रकरणी , इतर काही कंपन्यांना ५७ कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आलेला आहे. न्यायालयाने यासंदर्भात वसुलीवरील स्थगितीही उठवली आहे . परंतु विद्यमान तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी आजतागायत या कंपन्यांकडील दंड वसूल करण्याबाबत कोणतीही पावले उचललेली नाहीत. याउलट प्रसिद्धी माध्यमे तसेच तक्रारदार दादा चव्हाण यांच्यापासून माहिती दडवून ठेवणे, एकही कारवाईचा कागद त्यांच्या हाती पडू न देणे, असे कृत्य केले असल्याचे आरोप दादासाहेब चव्हाण यांनी केले आहेत.
सदर प्रकरणांसंदर्भात पंढरपूरचे तहसीलदार सुशील बेल्हेकर तसेच पंढरपूर तालुक्याचे गौण खनिज अधिकारी सचिन शेंडगे यांची तात्काळ चौकशी करण्यात यावी. आणि त्यांना निलंबित करण्यात यावे ,अशी मागणी दादासाहेब चव्हाण यांच्याकडून करण्यात आली आहे. सदरची कारवाई नाही झाल्यास येत्या २७ डिसेंबर रोजी , विभागीय आयुक्त पुणे यांच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
चौकट
*दंड झालेल्या कंपन्या आणि त्यांच्याकडील दंडाची रक्कम*
*श्री संत एकनाथ महाराज पालखी मार्ग - या राष्ट्रीय महामार्गाचे काम करणाऱ्या ए. आर. पी. आय. रोडवेज या सोलापूरच्या कंपनीस, ३,६५,६६४०० रुपयांचा दंड आकारण्यात आलेला आहे. हा दंड आकारण्यावरील स्थगिती न्यायालयाने उठवली आहे हा दंड वसुलीस पात्र आहे.*
*पेहे येथील शेतकरी आबा पाटील यांना 44 लाख 92 हजार पाचशे रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.*
*भंडीशेगाव येथून अवैध उत्खनन केल्यामुळे रोडवेज सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीस 52 लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे*
*या शिवाय इतर कंपन्या ज्या कंपन्यांनी पंढरपूर तालुक्यातून मुरूम आणि दगडाचे उत्खनन केले आहे या कंपन्यांना ५७ कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. हा दंड वसुलीस पात्र असूनही, वसूल केला गेला नाही*
चौकट
शेवते येथील सद्गुरु स्टोन क्रेशरसंदर्भात तक्रार करूनही, या क्रेशरवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.