*डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे संस्थात्मक वाटचाल – डॉ. प्रभाकर कोळेकर*

पंढरपूर – भारत देशाबरोबर स्वतंत्र मिळविलेल्या इतर देशातील सामाजिक आणि राजकीय परिस्थितीची बिकट अवस्था लक्षात घेतली तर भारतीय लोकशाहीचे मोठेपण लक्षात येवू शकेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही केवळ एक व्यक्ती किंवा विचार राहिला नाही. तर अखिल मानव जातीला प्रेरणा, प्रोत्साहन देणारी एक संस्थात्मक वाटचाल आहे.” असे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील प्राचीन इतिहास, साहित्य आणि संस्कृती तथा पुरातत्त्व विभागाचे प्रमुख डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान व इतिहास अभ्यास व संशोधन मंडळाच्या वतीने ‘आझादी का अमृत महोत्सव’अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिनानिमित्त ‘सामाजिक चळवळीमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान’ या विषयावर ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कुंडलिक शिंदे हे होते.
डॉ. प्रभाकर कोळेकर पुढे म्हणाले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रज्ञा, शील, करुणा, स्वातंत्र्य, समता, बंधूता, सामाजिक न्याय, सहिष्णूता या बाबी भारतीय संविधानाच्या माध्यमातून समस्त देशाला बहाल केल्या आहेत. चवदार तळ्याच्या सत्याग्रहापासून त्यांची सामाजिक समतेसाठी अनेक आंदोलने झालेली दिसतात. या आंदोलनात त्यांनी हिंसात्मक मार्गाचा अवलंब न करता सत्याग्रहाच्या मार्गांनी आंदोलने केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा एकूणच जीवनप्रवास सर्वाना प्रेरणा देणारा आहे. म्हणून जागतिक स्तरावरील विचारवंत व तज्ज्ञ अभ्यासक म्हणून त्यांचा गौरव केला जातो.”
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. कुंडलिक शिंदे म्हणाले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तीमत्त्व हे बहुआयामी असे होते. अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, धर्मशास्त्र, विधीशास्त्र, साहित्य, इतिहास, अनुवंशशास्त्र या शास्त्रांचे अभ्यासक म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. इंग्रजी, हिंदी, मराठी, संस्कृत आदी भाषेसह अनेक भाषेचे ज्ञान त्यांनी अवगत केले होते. वाचनाचा व्यासंग त्यांनी जोडलेला असून त्यांच्या व्यक्तिगत ग्रंथालयात पंचवीस हजार पेक्षा अधिक ग्रंथाचा संग्रह नोंदविलेला दिसतो. जगातील अनेक देशांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा गौरव केला असून त्यांचा जन्मदिवस कॅनडा- कोलंबिया सरकारने समानता दिवस म्हणून घोषित केला आहे.”
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रोफेसर डॉ. हनुमंत लोंढे यांनी केले. प्रमुख वक्त्यांचा परिचय डॉ. रविराज कांबळे यांनी करून दिला. या कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. तानाजी लोखंडे, उपप्राचार्य डॉ. बजरंग शितोळे, उपप्राचार्य डॉ. लतिका बागल, रुसा समन्वयक प्रा. घन:शाम भगत, महाविद्यालय अंतर्गत सुधार समितीचे डॉ. अमर कांबळे, स्वायत्त समन्वयक डॉ. मधुकर जडल, प्रोफेसर डॉ. चांगदेव कांबळे, कार्यालयीन प्रमुख अनंता जाधव आदीसह सिनिअर, ज्युनिअर व व्यवसाय अभ्यासक्रम विभागातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर सेवक बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दत्तात्रय चौधरी यांनी केले. शेवटी उपस्थितांचे आभार डॉ. उमेश साळुंखे यांनी मानले.
..................................................................................................