*प्रवासी सवलतीचे एनसीएमसी कार्ड काढण्यासाठी मुदत वाढविण्यात यावी*- *ग्राहक पंचायतीची राज्य परिवहन महामंडळाकडे मागणी*
पंढरपूर/प्रतिनिधी
प्रवासी सवलतीचे एनसीएमसी कार्ड काढण्यासाठी मुदत वाढविण्यात यावी अशी मागणी परिवहन महामंडळाचे अध्यक्ष ना.प्रतापराव सरनाईक यांच्याकडे अ.भा.ग्राहक पंचायतीने केली असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष शशिकांत हरिदास यांनी दिली.
राज्य परिवहन महामंडळातर्फे प्रवासात सवलत मिळण्यासाठी १ऑगस्ट २०२६ पासून एनसीएमसी कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. त्यामुळे ३१ जुलै अखेर सवलतीचे एनसीएमसी कार्ड काढावे लागणार आहे.
राज्यातील एसटी महामंडळाच्या बसस्थानकावरील केंद्रामध्ये एनसीएमसी कार्ड घेण्यासाठी ज्येष्ठ/अमृत प्रवासी नागरिक,महिला,इ.ची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.प्रवाशांना अनेक हेलपाटे मारावे लागत असल्याने त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अनेक प्रवासी कार्डसाठी नोंदणी करत आहेत.
वास्तविक सवलत घेणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता एनसीएमसी कार्ड काढण्यासाठी किमान एक महिना (३१ऑगस्ट अखेर) मुदतवाढ देण्यात यावी. मुदत वाढविलेबाबत नियुक्त केलेल्या एजन्सीमार्फत त्या आगाराच्या परिसरामध्ये, तसेच जिल्ह्यामध्ये कार्यरत असलेली केंद्रे,चौकशी कक्ष,आरक्षण खिडकी,स्थानक प्रमुखांच्या कार्यालयामध्ये ठळक अक्षरात प्रवाशांना दिसेल अशा पद्धतीने हे लवकरात लवकर प्रसिद्ध करणेत यावे.
वस्तुस्थिती लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळ मुदत वाढवून प्रवाशांना दिलासा देईल अशी अपेक्षा अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे प्रांत सदस्य विनोद भरते,सुभाष सरदेशमुख,सहसचिव दीपक इरकल,जिल्हा सचिव सुहास निकते,सहसचिव दीपक भंडारककवठेकर,जिल्हा महिला प्रमुख सौ.माधुरी परदेशी,सदस्य अण्णा ऐतवाडकर यांनी व्यक्त केली आहे.